Hindu Marriage Allahabad High Court : हिंदु विवाह एखाद्या कराराप्रमाणे संपुष्‍टात आणू शकत नाही ! – अलाहाबाद उच्‍च न्‍यायालय

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – अलाहाबाद उच्‍च न्‍यायालयाने नुकतेच हे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. न्‍यायालयाने म्‍हटले की, हिंदु पद्धतीने केलेला विवाह एखाद्या कराराप्रमाणे संपुष्‍टात आणला जाऊ शकत नाही किंवा विसर्जित केला जाऊ शकत नाही. हिंदु पद्धतीने केलेला विवाह धार्मिक संस्‍कारांवर आधारित असतो आणि तो केवळ विशिष्‍ट परिस्‍थितीतच कायदेशीररित्‍या केला जाऊ शकतो. जर एखादा पती किंवा पत्नी यांच्‍यावर अपत्‍य नसल्‍याचा आरोप असेल, तर तो आरोप पुराव्‍याच्‍या आधारेच सिद्ध होऊ शकतो.

१. या प्रकरणात वर्ष २००६ मध्‍ये विवाह झालेल्‍या जोडप्‍यातील पती भारतीय सैन्‍यात आहे. त्‍याने वर्ष २००८ मध्‍ये घटस्‍फोटासाठी अर्ज केला होता. पतीने दावा केला की, त्‍याची पत्नी मूल जन्‍माला घालू शकत नाही. या आधारावर त्‍याने घटस्‍फोट मागितला.

२. पत्नीने तिच्‍या पहिल्‍या लेखी निवेदनात घटस्‍फोटासाठी संमती दिली होती. तथापि वर्ष २०१० मध्‍ये पत्नीने घटस्‍फोटाला विरोध करणारे दुसरे लिखित विधान प्रविष्‍ट (दाखल) केले आणि वंध्‍यत्‍वाविषयी पतीच्‍या आरोपाचे खंडन करण्‍यासाठी कागदपत्रे सादर केली. तिने हेदेखील उघड केले की, वर्ष २००८ मध्‍ये जेव्‍हा घटस्‍फोटाचा अर्ज केलो होता, त्‍यापूर्वीच तिने एका मुलाला जन्‍म दिला होता आणि वर्ष २०१० मध्‍ये दुसर्‍या मुलाला जन्‍म दिला होता.

३. कौटुंबिक न्‍यायालयाने पतीचा आक्षेप मान्‍य करत पत्नीच्‍या दुसर्‍या लेखी निवेदनाकडे दुर्लक्ष केले. त्‍याच दिवशी न्‍यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करत पतीचा घटस्‍फोट अर्ज संमत केला. या निर्णयाला पत्नीने उच्‍च न्‍यायालयात आव्‍हान दिले होते.