डॉक्टरची कॉलर धरली, पट्ट्यांनी मारहाणीचा प्रयत्न !
छत्रपती संभाजीनगर – हृदयाशी संबंधित आजाराने ग्रासलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाइकांनी आधुनिक वैद्याच्या दालनाची तोडफोड केली, तर आधुनिक वैद्यांना पट्ट्यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला. ही घटना १३ सप्टेंबर या दिवशी मध्यरात्रीनंतर कमलनयन बजाज रुग्णालयात घडली. शिवाजी जोगदंड आणि त्यासमवेत एक महिला अशी संशयित आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी आधुनिक वैद्य महेश केशव चौधरी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार १३ सप्टेंबर या दिवशी दत्तात्रय सुरेशराव तळेकर यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांची पडताळणी केल्यानंतर रुग्णाची स्थिती गंभीर असून शस्त्रकर्म केल्यानंतरही जगण्याची शक्यता अल्प असल्याची माहिती आधुनिक वैद्य आणि त्यांचे पथक यांनी रुग्णाच्या नातेवाइकांना दिली होती, तसेच ‘तुम्ही रुग्णाला मुंबई, पुणे येथेही घेऊन जाऊ शकता’, असे सांगितले होते. त्यावर रुग्णाच्या नातेवाइकांनी रुग्णावर शस्त्रकर्म करण्याची विनंती केली. रुग्णावर शस्त्रकर्म चालू असतांना १४ सप्टेंबरच्या मध्यरात्री रुग्णाचा मृत्यू झाला.