J&K Last Stage Terrorism : जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये आतंकवाद त्‍याची अंतिम घटिका मोजत आहे ! – पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीनिमित्त डोडा जिल्ह्यात संबोधित करतांना

दोडा (जम्‍मू-काश्‍मीर) : जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये दिवस-रात्र कधीही अघोषित संचारबंदी लागू असायची. जम्‍मू-काश्‍मीरची स्‍थिती इतकी वाईट होती की, तत्‍कालीन काँग्रेस सरकारचे गृहमंत्रीसुद्धा काश्‍मीरमधील लाल चौकात जायला घाबरत होते. मागील १० वर्षांत या परिस्‍थितीत मोठा पालट झाला असून जम्‍मू-काश्‍मीरमधील आतंकवाद आता त्‍याची अंतिम घटिका मोजत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. जम्‍मू-काश्‍मीरची निवडणूक घोषित झाल्‍यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही पहिलीच सभा आहे. त्‍या पार्श्‍वभूमीवर दोडा येथे कडेकोट पोलीस बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला आहे.

पंतप्रधान पुढे म्‍हणाले,

१. पूर्वी जे दगड सैनिकांवर फेकले जायचे, त्‍याच दगडांद्वारे आता जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये नवनिर्माण होत आहे.

२. काँग्रेस, नॅशनल काँग्रेस आणि पीडीपी या ३ कुटुंबांनी मिळून जम्‍मू-काश्‍मीचे नाश केला. त्‍यामुळे जम्‍मू-काश्‍मीरमधील यंदाची ही निवडणूक ही ३ कुटुंबे विरुद्ध युवक, अशी आहे.

३. जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये रहाणारी कुठल्‍याही जाती-धर्माच्‍या कुठल्‍याही व्‍यक्‍तीच्‍या अधिकारांचे रक्षण, हेच भाजपचे प्राधान्‍य आहे.

दोडामध्‍ये ४० वर्षांनी प्रथमच पंतप्रधानांची सभा

दोडा येथे ४० वर्षांनी प्रथमच पंतप्रधानांची सभा होत आहे, अशी माहिती भाजपचे जम्‍मू काश्‍मीरचे निवडणूक प्रमुख जी. किशन रेड्डी यांनी दिली. यापूर्वी वर्ष १९८२ मध्‍ये सभा झाली होती.

जम्‍मू-काश्‍मीर मध्‍ये ३ टप्‍प्‍यांत मतदान, ८ ऑक्‍टोबरला निकाल !

जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये १८ सप्‍टेंबर, २५ सप्‍टेंबर आणि १ ऑक्‍टोबर अशा ३ टप्‍प्‍यांमध्‍ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. पहिल्‍या टप्‍प्‍यात ८ मतदारसंघांसाठी निवडणूक होईल. हे मतदारसंघ दोडा येथील ३ जिल्‍ह्यांमधले आहेत.  काश्‍मीर येथील १६ जागांसाठीही याच दिवशी मतदान होईल. भाजपचे नेते गजयसिंह राणा यांनी दोडा येथून उमेदवारी अर्ज भरला आहे, तर शक्‍ती राज परिहार हे दोडा पश्‍चिम मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे आहेत.

हरियाणा येथील निवडणूक ५ ऑक्‍टोबरला होणार आहे. हरियाणा आणि जम्‍मू काश्‍मीर येथील निवडणुकींचे निकाल ८ ऑक्‍टोबरला लागणार आहेत.