हिंदु एकता आंदोलनाची पोलिसांकडे तक्रार आवेदनाद्वारे मागणी !
सांगली, १३ सप्टेंबर (वार्ता.) – व्हॉट्सॲप ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम आदि सामाजिक माध्यमांमध्ये आलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या व्हिडिओमध्ये ज्ञानेश महाराव या व्यक्तीने संभाजी ब्रिगेडच्या मुंबई येथील कार्यक्रमांमध्ये हिंदु देवता आणि संत पुरुष यांच्याविषयी आक्षेपार्ह अन् वादग्रस्त विधाने केलेली आहेत. प्रभु रामचंद्र आणि श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणार्या ज्ञानेश महाराव यांच्यावर गुन्हा नोंद करावा, अशा मागणीचे तक्रारीचे आवेदन १३ सप्टेंबर या दिवशी हिंदु एकता आंदोलन आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांना देण्यात आले.
या तक्रार आवेदनात म्हटले आहे की, ज्ञानेश महाराव यांनी प्रभु रामचंद्राच्या घराण्याविषयी आणि श्री स्वामी समर्थांच्या विषयी बेताल विधाने करून श्री समर्थ भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. हिंदु समाजाच्या भावना दुखावण्याच्या हेतूने जाणून-बुजून आक्षेपार्ह आणि अश्लील विधाने केली आहेत. त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. तरी ज्ञानेश महाराव यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंद करून त्यांना लगेच अटक करावी, तसेच संभाजी ब्रिगेडचे अधिवेशन आयोजित केलेल्या संयोजकांवरही गुन्हा नोंद करून त्यांना सहआरोपी करण्यात यावे.
या वेळी हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री. नितीन शिंदे, श्री. लक्ष्मण नवलाई, श्री. अविनाश मोहिते, श्री. अजयकुमार वाले, सर्वश्री अवधूत जाधव, अनिरुद्ध कुंभार, श्री. चंद्रकांत बेलवलकर, सुभाष गदडे, मोहन जाधव, बाळासो पाटील आदी उपस्थित होते.