अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरचे ‘श्री विजयपुरम्’ असे नामकरण !

नवी देहली – केंद्रशासनाने अंदमान निकोबार बेटांची राजधानी पोर्ट ब्लेअरचे नाव पालटले असून ते यापुढे ‘श्री विजयपुरम्’ या नावाने ओळखले जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून ही माहिती दिली. ‘देशाला गुलामगिरीच्या सर्व प्रतीकांपासून मुक्त करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे. यातून प्रेरित होऊन गृह मंत्रालयाने पोर्ट ब्लेअरचे नाव ‘श्री विजयपुरम्’ असे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘श्री विजयपुरम्’ हे नाव आपला स्वातंत्र्यलढा आणि त्यामधील अंदमान निकोबारचे योगदान दर्शवत राहील. शहा यांनी पुढे म्हटले, ‘चोल सम्राटांनी या बेटांवरच त्यांच्या नौदलाचे तळ उभारले होते. हे बेट भारताची सुरक्षा आणि विकास यांना गती देण्यासाठी सज्ज झाले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी या बेटावर भारताचा राष्ट्रध्वज फडकावला होता. वीर सावरकर आणि इतर स्वातंत्र्यसैनिक यांनी भारतमातेला गुलामीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठीचा मोठा लढाही येथे उभारला होता. हे बेट त्या स्वातंत्र्यलढ्याची साक्ष देत आहे.’