श्री गणेशचतुर्थीला ‘धाराशिव-तुळजापूर-सोलापूर’ या नव्या रेल्वे मार्गाच्या कामाचा प्रारंभ !

धाराशिव – श्री गणेशचतुर्थीला ‘धाराशिव-तुळजापूर-सोलापूर’ या ११० किलोमीटरच्या नव्या रेल्वे मार्गाच्या कामाचा प्रारंभ तुळजापूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या श्री तुळजाभवानीदेवी हे तीर्थक्षेत्र आता लवकरच मुख्य रेल्वे मार्गाला जोडले जाईल. या रेल्वेमार्गाचे ‘जंक्शन’ (विविध मार्गांवरून येणार्‍या रेल्वे एकत्र येण्याचे ठिकाण) धाराशिव येथे होणार आहे.

‘धाराशिव-तुळजापूर-सोलापूर’ हा एकूण ८४.४४ किलोमीटर लांबीचा मार्ग असून त्यात ११० पूल आणि ३ मोठे उड्डाणपूल असणार आहेत. साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असूनही तुळजापूर हे असे ठिकाण आहे जिथे अद्याप रेल्वेची सुविधा नाही. त्यामुळे मुंबई-पुण्यासह अन्य महानगरांतून दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची गैरसोय होते. या नव्या रेल्वे सेवेमुळे भाविकांची गैरसोय दूर होण्यास साहाय्य होणार आहे.