संतांच्या अस्तित्वामुळे पावन झालेली अनेक ठिकाणे भारतात आहेत. तेथे गेल्यावर लोकांना विविध अनुभूती येतात. सांप्रत काळीही सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करून संत झालेल्या साधकांच्या विविध वस्तू, त्यांचे निवासस्थान इत्यादींच्या संदर्भातही अनेक साधकांना अशाच प्रचीती येत आहेत. याचेच एक उदाहरण, म्हणजे सनातन संस्थेचे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील खोलीत गेल्यावर साधकांना निरनिराळ्या अनुभूती येतात. त्यासंदर्भातील साधिकेच्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. पुष्कळ आध्यात्मिक उपाय होणे
‘अनुमाने ५ – ६ वर्षांपूर्वी आश्रमात सर्वांत व्यवस्थित असणार्या खोल्यांमधील एक खोली सद्गुरु दादांची (सनातन संस्थेचे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांची) होती. तेव्हा ‘खोली कशी असावी ?’, हे शिकण्याच्या दृष्टीने मी त्यांच्या खोलीत ५ – १० मिनिटांसाठी गेले होते. तेव्हा माझ्यावर पुष्कळ आध्यात्मिक उपाय झाले. त्यांच्या खोलीत मला सतत जांभया आणि ढेकरा येत होत्या.
२. सद्गुरु राजेंद्र दादांच्या खोलीत गेल्यावर मनातील नकारात्मक विचार नष्ट होऊन मनात सकारात्मक विचार येणे
४.१२.२०२३ या दिवशी मला सकाळपासून पुष्कळ आध्यात्मिक स्तरावरील त्रास होत होता आणि बराच वेळ सेवा किंवा नामजप करूनही माझा त्रास उणावत नव्हता. मी एका सेवेसाठी सद्गुरु दादांच्या खोलीत गेले आणि त्यांच्याशी त्या सेवेसंदर्भात १ मिनिट बोलले. त्यांच्या खोलीतून बाहेत पडताक्षणी माझ्या मनात सहजतेने पुढील विचार आले, ‘मला झोकून देऊन साधना करायची आहे. प्रत्येक क्षण केवळ आणि केवळ गुरुचरणी अर्पण करायचा आहे. ईश्वरप्राप्ती हेच माझ्या जीवनाचे ध्येय आहे. ईश्वराव्यतिरिक्त मला आयुष्यात काहीच नको. त्रासाशी कितीही लढावे लागले, तरी मला लढायचे आहे. गुरुदेव मला या त्रासांतून बाहेर काढणारच आहेत, मला केवळ स्वत:चे क्रियामाण १०० टक्के वापरायचे आहे.’ त्यानंतर माझे मन १०० टक्के सकारात्मकतेने भरून गेले.
‘संतांचा निवास, सहवास आणि त्यांच्यातील चैतन्य यांमुळे निर्जीव वास्तू पवित्र तीर्थक्षेत्र होते’, हे मी अनेकांकडून ऐकले होते; पण सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्यामुळे मला त्याची प्रत्यक्ष अनुभूती आली. ही अनुभूती दिल्याविषयी सद्गुरु राजेंद्र शिंदे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’
– सौ. राधा रवींद्र साळोखे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (९.१२.२०२३)
‘१५ ते २२.४.२०२४ हा एक आठवडा मी देवद (पनवेल) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात सेवेसाठी गेले होते. तेव्हा सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या खोलीत अभ्यासासाठी गेल्यावर मला आलेल्या अनुभूती येथे देत आहे.
१. खोलीत जाताच सुगंधाची अनुभूती येणे
२१.४.२०२४ या दिवशी मी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या खोलीत गेले होते. खोलीत जाताक्षणी मला सुगंधाची अनुभूती आली आणि माझे मन एकदम प्रसन्न झाले.
२. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी खोलीत सूक्ष्मातील प्रयोग करण्यास सांगितल्यावर आलेल्या अनुभूती
२ अ. ‘डोळे बंद करून खोलीत काय जाणवते ?’, ते अनुभवणे : सद्गुरु राजेंद्रदादा मला म्हणाले, ‘‘डोळे मिटून खोलीत काय जाणवते ?’, ते अनुभवा.’’ त्याप्रमाणे मी डोळे मिटून बसले. त्या वेळी मला पुढील अनुभूती आल्या.
१. मला ‘सद्गुरु राजेंद्रदादांची खोली, म्हणजे ब्रह्मांड आहे आणि त्यामध्ये मी एकटीच आहे’, असे जाणवले अन् माझे ध्यान लागले. मला ‘सभोवती काय आहे ?’, हे कळत नव्हते.
२. मला पुष्कळ शांत वाटत होते आणि ‘त्या स्थितीतून बाहेर येऊच नये’, असे वाटत होते.
३. सौ. मीनलताई (सद्गुरु राजेंद्रदादा यांच्या पत्नी) यांनी मला स्पर्श करून उठवले. तेव्हाच मी डोळे उघडून भानावर आले.
२ आ. ‘डोळे बंद करून काही नाद ऐकू येतो का ?’ ते अनुभवणे : सद्गुरु राजेंद्रदादा मला पुढे म्हणाले, ‘‘आता परत डोळे बंद करून काही नाद ऐकू येतो का ?, ते अनुभवा.’’ मग मी डोळे बंद करून बसले. त्या वेळी मला पुढील अनुभूती आल्या.
१. मला ॐऽऽ ॐऽऽ असा नाद ऐकू आला.
२. मला पुष्कळ आनंद झाला आणि माझे मन निर्विचार झाले.
या अनुभूती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या कृपेने आल्या. त्यामुळे मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– श्रीमती अनुराधा मुळ्ये (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६३ वर्षे), पनवेल. (१४.७.२०२४)
|