द्रव्य घेऊन कथा आणि प्रवचन करणे – आध्यात्मिक क्षेत्रातील अपप्रकार !

‘सध्या आध्यात्मिक क्षेत्रातही अपप्रकार होत आहेत. काही प्रसिद्ध प्रवचनकार, कीर्तनकार, संत, गुरु, ज्यांच्या प्रवचनांना लोकांचा पुष्कळ प्रतिसाद लाभत आहे, तसेच ज्यांना पुष्कळ प्रसिद्धी मिळत आहे, ते प्रवचन करण्यासाठी पुष्कळ पैशांची मागणी करत आहेत. हे एक प्रकारे आध्यात्मिक क्षेत्राचे व्यावसायिकरणच आहे. ‘हे अयोग्य आहे’, असे कुणाच्या लक्षातही येत नाही. ‘याचे प्रवचनकार, कीर्तनकार, संत किंवा गुरु, तसेच समाजमन यांवर काय परिणाम होतात ?’, ते पाहूया.

(भाग १)

प्रतिकात्मक छायाचित्र

१. प्रवचन करण्याच्या नावाखाली होत असलेली पैशांची उधळपट्टी

‘प्रवचन करण्यासाठी आणि कथा सांगण्यासाठी समाजातील काही संत अन् प्रवचनकार लक्षावधी रुपये घेतात’, असे लक्षात आले आहे, तर ‘काही प्रवचनकार कोट्यवधी रुपये घेतात’, असे ऐकले आहे. कार्यक्रमाच्या आयोजकांना संत आणि त्यांच्या समवेत असणारे त्यांचे अनुयायी, साधक आदींना विमानाचे तिकीट काढून द्यावे लागते. काही जण विमानातील महागड्या ‘बिझनेस क्लास’चे तिकीट काढायला सांगतात. काही जण ‘चार्टर्ड विमान’ (लहान विमान भाड्याने घेणे) ठरवायला सांगतात. हे अतिशय खर्चिक असते. संत आणि त्यांच्या समवेत असणारे त्यांचे अनुयायी यांना विमानतळावरून नियोजित स्थळी जाण्यासाठी चांगल्या गाड्यांची व्यवस्था करावी लागते. संतांना रहाण्यासाठी उत्तम दर्जाची आणि महागडी व्यवस्था करायला सांगितली जाते.

१ अ. कार्यक्रमाची प्रसिद्धी करण्यासाठी पुष्कळ पैसा व्यय करणे : अशा संतांच्या मार्गदर्शनाच्या कार्यक्रमाची विज्ञापने मोठ्या प्रमाणात वृत्तपत्रांत आणि दूरचित्रवाहिन्यांवर दिली जातात. शहरातही मोठ्या प्रमाणात भित्तीपत्रके आणि फलक लावले जातात. कार्यक्रमाच्या ठिकाणी अत्यंत आकर्षक आणि खर्चिक व्यासपीठ, तसेच बैठक व्यवस्था केली जाते. आताच्या महागाईच्या काळात ‘यासाठी किती पैसा व्यय होत असेल ?’, याचा आपण विचारच करू शकत नाही. हे सर्व पाहून आणि ऐकून फार आश्चर्य वाटते.

१ आ. एका जिल्ह्यात एका संप्रदायाच्या साधकांना त्यांच्या संप्रदायाच्या प्रमुख संतांचे मार्गदर्शन ठेवायचे होते; परंतु त्या संतांना द्यावी लागणारी मोठी रक्कम ते गोळा करू शकले नाहीत. त्यामुळे त्या संतांचा कार्यक्रम त्या जिल्ह्यात झाला नाही.

१ इ. संतदर्शन, चरणस्पर्श, पाद्यपूजन इत्यादीसाठी पैसे द्यावे लागणे : काही संप्रदायांमध्ये प्रमुख संतांचे दर्शन घेणे, त्यांना चरणस्पर्श करणे, त्यांचे पाद्यपूजन करणे, त्यांच्यासह भोजन करणे इत्यादीसाठी पुष्कळ पैसे द्यावे लागतात. त्याचे मूल्य ठरलेले असते.

१ ई. संतांच्या अनुयायांवर ‘साधना करणे, म्हणजे पैसे कमावणे’, असा अयोग्य संस्कार होणे : अशा मार्गदर्शक संतांच्या कृतीमुळे त्यांच्या अनुयायांवरही ‘साधना करणे, म्हणजे पैसे कमावणे किंवा ते पैसे कमावण्याचे एक माध्यम आहे’, असा अयोग्य संस्कार होतो, उदा. अनेक संप्रदायातील साधक त्यांच्या मार्गदर्शकांनी सांगितल्यानुसार समाजात जाऊन प्रसार करतात. त्या वेळी ते कार्य करण्यासाठी मानधन घेतात. एका संप्रदायातील साधक तणावमुक्तीसाठी अभ्यासवर्ग घेण्यासाठी २५ ते ५० सहस्र रुपये घेतात. ‘काही संप्रदायात ‘हिलिंग’ किंवा अन्य उपचार करण्यासाठी किंवा शिकवण्यासाठी अभ्यासवर्गांचे सभागृह किंवा ‘हॉटेल’ यांत आयोजन करून प्रत्येकाकडून सहस्रो रुपये घेतात’, असे लक्षात आले आहे. असे करणारे ‘ही माझी साधना आहे’, असे सांगतात. हे सर्व ऐकून ‘आध्यात्मिक क्षेत्राचेही बाजारीकरण कसे झाले आहे ?’, हे लक्षात येते. साधक आणि अनुयायी यांच्यावरही अप्रत्यक्षपणे अशा प्रकारे अयोग्य वागण्याचा संस्कार होतो. अशा कृतींमुळे सर्वसामान्य व्यक्तीच्या मनात अध्यात्म आणि साधना यांविषयी प्रश्न निर्माण होतात.

२. अध्यात्म जगण्यातील त्यागाचे महत्त्व

सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे

२ अ. साधना करणे, म्हणजे स्वतःमध्ये ईश्वरी गुणांची वृद्धी करणे : साधना करणे, म्हणजे ईश्वराशी एकरूप होण्याची प्रक्रिया आहे. त्यासाठी ईश्वराचे गुण अंगी बाणवणे आवश्यक असते. ईश्वराचा ‘काटकसरीपणा’ हा एक गुण आहे; मात्र काही संत आणि त्यांचे अनुयायी यांच्याकडून पैशांची उधळपट्टी होत असते. ईश्वराशी एकरूप होण्यासाठी ज्ञान, भक्ती यांसह वैराग्य प्राप्त होणे आवश्यक असते.

२ आ. अध्यात्म हे त्यागाचे शास्त्र असून पैसे कमवण्याचे माध्यम नसणे, त्याचप्रमाणे साधना करतांना तन, मन आणि धन, तसेच सर्वस्व अर्पण करणे आवश्यक असणे : असे संत आणि त्यांचे अनुयायी यांना ‘ते साधना करत आहेत’, असे वाटते; परंतु ‘अध्यात्म हे त्यागाचे शास्त्र आहे. ते पैसे कमवण्याचे माध्यम नव्हे’, हे तथाकथित संत आणि त्यांचे अनुयायी यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे’, असे वाटते. साधना करतांना तन, मन आणि धन, तसेच सर्वस्व अर्पण करायचे असते. गुरु आचरणातून शिष्य आणि साधक यांना ‘त्याग कसा करायचा ?’, हे शिकवतात.

२ इ. भारतातील महान गुरु-शिष्य परंपरा ! : आतापर्यंत आपण गुरु-शिष्य परंपरेच्या ज्या कथा वाचल्या किंवा ऐकल्या आहेत, त्यात ‘गुरु किंवा संत यांनी शिष्य किंवा भक्त यांच्याकडून त्यांना साधना शिकवण्यासाठी किंवा त्याच्या घरी जाण्या-येण्यासाठी किंवा दर्शन देण्यासाठी कधी मानधन घेतले आहे’, असे वाचले किंवा ऐकले नाही.

२ ई. खरे साधक आणि भक्त यांना ‘गुरु आपली काळजी घेत आहेत’, अशी श्रद्धा असल्याने ते निश्चिंत असणे : खरे साधक किंवा संत यांना पैशाची भ्रांत नसते. ते सेवेसाठी कधी दुसर्‍याकडे पैसे मागत नाहीत. त्यांना जे काही स्वेच्छेने अर्पण मिळते, ते ईश्वरेच्छा समजून स्वीकारतात. असे संत किंवा शिष्य जे मानधन मिळेल, त्यात समाधानी असतात. ‘सर्वसामर्थ्यवान गुरु आपली काळजी घेत आहेत आणि घेणारच आहेत’, यावर शिष्यांची दृढ श्रद्धा असते.

२ उ. ‘द्रव्य घेऊन कथा सांगणे’, हे पाप आहे’, असे सांगणारा जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा अभंग ! : जे प्रवचन देण्यासाठी किंवा कथा सांगण्यासाठी पैसे घेतात, त्यांच्यासाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पुढील अभंग मार्गदर्शक आहे.

कथा करोनिया द्रव्य देती घेती ।
तयां अधोगति नरकवास ।।

रवरव कुंभपाक भोगिती यातना ।
नये नारायणा करुणा त्यांची ।।

असिखड्गधारा छेदिती सर्वांग ।
तप्तभूमी अंग लोळविती ।।

तुका म्हणे तया नरक न चुकती ।
सांपडले हातीं यमाचिया ।।

– तुकाराम गाथा, अभंग ९६८

अर्थ : संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘हरिकथा सांगून जे द्रव्य घेतात आणि देतात, त्या दोघांची अधोगती होऊन त्यांना नरकप्राप्ती होते. ते रौरव आणि कुंभपाक यांच्या नरकयातना भोगतात. नारायणालाही त्यांची करुणा येत नाही. यमदूत तलवारीच्या धारेने त्यांचे शरीर छेदतात आणि त्यांना तप्त भूमीवर लोळवतात. अशा लोकांच्या नरकयातना कधीही चुकत नाहीत. ते प्रत्यक्ष यमाच्या हातीच सापडलेले असतात.

२ ऊ. साधकाला येत असलेली ‘योगक्षेमं वहाम्यहम् ।’ या वचनाची प्रचीती ! : साधना करतांना तन, मन आणि धन यांचा त्याग करायचा असतो. असा त्याग केलेल्या साधकाला ‘भगवंत त्याची पदोपदी काळजी घेत आहे’, याची अनुभूती येते आणि त्यातूनच त्याची भगवंतावरील श्रद्धा वाढीस लागते. ‘योगक्षेमं वहाम्यहम् ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ९, श्लोक २२), म्हणजे ‘नित्य माझे चिंतन करणार्‍या माणसांचा योगक्षेम मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो’, या गीतेतील वचनाची तो अनुभूती घेत असतो.

सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींनी सुचवलेली शब्दसुमने कृतज्ञताभावाने त्यांच्या चरणी अर्पण !

(क्रमशः पुढच्या रविवारी)

‘इदं न मम ।’ (अर्थ : हे लिखाण माझे नाही.)

– (सद्गुरु) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.  (२०.१२.२०२३)