गणेशोत्सवात प्रशासनाने ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘श्री गणेशमूर्तीदान’ या संकल्पना राबवू नयेत !

हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर महापालिका आयुक्तांना निवेदन

कोल्हापूर महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी (डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर, ३१ ऑगस्ट (वार्ता.) – गणेशोत्सवातील तथाकथित जलप्रदूषणाचे कारण सांगून प्रशासनाने ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘श्री गणेशमूर्तीदान’ या अशास्त्रीय संकल्पना राबवू नयेत, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांना देण्यात आले. या प्रसंगी हिंदुत्वनिष्ठांनी श्री गणेशमूर्ती विसर्जन हा भाविकांचा धार्मिक अधिकार असल्याने गणेशभक्त आणि भाविक वहात्या पाण्यातच विसर्जन करतील, अशी ठाम भूमिका आयुक्तांकडे मांडली. समितीच्या निवेदनाची नोंद घेऊन आयुक्तांना प्रशासन आवाहन करण्याचे काम करेल, कुणावरही बळजोरी करणार नाही, असे सांगितले.

या प्रसंगी महापालिका प्रशासनाने प्रशासन पंचगंगा नदीवर बॅरिकेड्स लावून मूर्तीविसर्जन करण्यास बंदी न करता ज्या भाविकांना पंचगंगा नदीत विसर्जन करावयाचे आहे, त्यांना ते करू देण्यात यावे, अशी भूमिकाही हिंदुत्वनिष्ठांनी आयुक्तांकडे मांडली. याच मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनाही देण्यात आले. हे निवेदन नायब तहसीलदार नम्रता चौगुले यांनी स्वीकारले.

जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार नम्रता चौगुले (डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, सकल हिंदु समाजाचे श्री. अभिजित पाटील, हिंदु ऐकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, श्री. संदीप शेटके, हिंदु महासभेचे जिल्हाप्रमुख श्री. मनोहर सोरप, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे आणि श्री. शिवानंद स्वामी, अखिल भारत हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप सासणे, मराठा उद्योजक श्री. प्रसन्न शिंदे, श्री. विक्रम जरग उपस्थित होते.