कोल्हापूर येथील सनातनच्या साधिका सौ. प्रियांका नील पाटील यांचे ‘एम्.टेक.’ परीक्षेत सुयश !

सौ. प्रियांका नील पाटील

कोल्हापूर, ३० ऑगस्ट (वार्ता.) – येथील सनातनच्या साधिका सौ. प्रियांका नील पाटील या ‘एम्.टेक.’ परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. सौ. प्रियांका या पुणे येथील ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी’च्या विद्यार्थिनी असून त्यांनी ‘कनस्ट्रक्शन मॅनेजमेंट’ या विषयात ‘एम्.टेक.’ केले आहे. याचा पदवीदान समारंभ नुकताच महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन् यांच्या उपस्थितीत पार पडला. यामध्ये सौ. प्रियांका पाटील यांनी पदव्युत्तर पदवीची शपथ घेतली. सौ. प्रियांका या कोल्हापूर येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि सनातनचे साधक श्री. आनंद पाटील यांच्या स्नुषा आहेत.

मिळालेल्या यशाविषयी सौ. प्रियांका पाटील म्हणाल्या,

‘‘अभ्यासक्रमाच्या कालावधीत मी पुणे येथे होते. त्या कालावधीत नामजप करणे, तसेच मी आणि यजमान श्री. नील हे दोघे प्रासंगिक सेवांमध्ये सहभागी असू. तेथे झालेल्या गुरुपौर्णिमा उत्सवांमध्ये मी सहभागी होत असे. कोणत्याही विषयाचा अभ्यास करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे स्मरण करून मी अभ्यास करत असे. त्यामुळे विषय आकलन होण्यास सुलभ होत असे. आमच्या १९ जणांच्या विद्यार्थ्यांच्या गटात मी एकटी मुलगी होती; मात्र श्रीगुरूंच्या कृपेमुळे मला कुठेही अडचण आली नाही. कोल्हापूर येथे असतांनाही मी शक्य तेव्हा सेवांमध्ये सहभागी होत असे.

दुसर्‍या वर्षाच्या शेवटी मी कुटुंबियांसमवेत गावी जात असतांना चारचाकी गाडीचा अपघात झाला. या अपघातात डोक्याला मोठा मार बसल्याने मला कोल्हापूर येथील रुग्णालयात भरती करावे लागले होते आणि डोक्याला टाके पडले होते. त्या कालावधीत मी ‘अतिदक्षता विभागातून’ काही परीक्षा, तसेच तोंडी परीक्षा दिली. केवळ श्रीगुरूंच्या कृपेनेच मी अशाप्रकारे परीक्षा देऊनही उत्तीर्ण होऊ शकले. या कालावधीत मी असलेल्या खोलीत श्रीकृष्णाची प्रतिमा होती; ज्याचा मला पुष्कळ लाभ झाला. अभ्यासक्रमाच्या कालावधीत मला सद्गुरु स्वाती खाडये यांचाही वेळोवेळी आशीर्वाद लाभला.’’

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक