१. आध्यात्मिक स्तरावरील उपाय करून आणि ‘महाशून्य’ हा नामजप करत नवीन चारचाकी गाडीने प्रवास करणे
‘८.८.२०२४ या दिवशी मी कोल्हापूरहून देवगड येथे एका साधकाची नवीन चारचाकी गाडी नेण्यासाठी प्रवास करत होतो. आम्ही चारचाकी गाडीची पूजा करून गाडीमध्ये नामपट्ट्यांचे छत लावले. आम्ही चारचाकी गाडीची नारळाने दृष्ट काढली आणि प्रवास चालू केला. साधकांच्या नातेवाइकांनी ‘कोल्हापूर ते कळंबा जेल’पर्यंत गाडी चालवली. त्यानंतर मी गाडी चालवत कागल मार्गाने येत होतो. आम्ही गाडीत बसल्यानंतर मी सर्वांना ‘महाशून्य’ हा जप करायला सांगितला. मीही ‘महाशून्य’ हा नामजप करत गाडी चालवत होतो.
२. मार्गातील एका वळणावर एका चारचाकी गाडीच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटणे आणि चारचाकी गाडी वेडीवाकडी येत अन्य एका दुचाकीवर आदळणे अन् ही घटना साधक चालवत असलेल्या गाडीपासून अवघ्या ५ फूट अंतरावर घडणे
मुख्य रस्त्याच्या (हायवेच्या) एका वळणावर मला समोरून अतिशय वेगाने येणारी एक चारचाकी गाडी दिसली. ‘वळणावर त्या गाडीच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आहे’, असे मला जाणवले. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेनेच माझ्या हे लक्षात आले. मी आमच्या गाडीची गती हळू करून डाव्या बाजूने गाडी चालवत होतो. समोरील गाडी वेडीवाकडी येत एका बाजूला कलंडली. नंतर ती गाडी वर उचलली जाऊन आमच्या गाडीच्या समोरून जात असलेल्या दुचाकी गाडीवर आदळली. तो दुचाकीस्वार ‘हेल्मेट’सह (शिरस्त्राणासह) दूर फेकला गेला आणि ती चारचाकी गाडी दुचाकीवर उलटी होऊन पडली अन् स्थिर झाली. ही घटना आमच्या गाडीपासून अवघ्या ५ फूट अंतरावर घडली.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आमचे आणि गाडीचे रक्षण झाले.
४. नंतर माझ्या छातीवर काही वेळ पुष्कळ दडपण आले. आम्ही प.पू. भक्तराज महाराजांचा जयघोष करून ‘महाशून्य’ हा नामजप करत गाडी बाजूला बाहेर काढली आणि मार्गस्थ झालो.
या गंभीर प्रसंगात आम्हाला ‘परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा आणि आम्ही करत असलेला ‘महाशून्य’ हा नामजप यांमुळे जीवनदान मिळाले. सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. भास्कर खाडिलकर (वय ६३ वर्षे), देवगड (९.८.२०२४)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |