महिला पत्रकाराविषयी मानहानीकारक वक्तव्याचे प्रकरण !
मुंबई – बदलापूर येथील विद्यार्थिनींच्या लैंगिक अत्याचाराचे वृत्तांकन करणार्या महिला पत्रकाराला माजी नगरसेवक वामन म्हात्रे यांनी ‘तू अशा बातम्या करत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे’, असे मानहानीकारक वक्तव्य केले होते. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कल्याण सत्र न्यायालयाला वामन म्हात्रे यांच्या अटकपूर्व जामिनाविषयी तातडीने सुनावणी घेण्याचा आदेश दिला आहे. २९ ऑगस्ट या दिवशी ही सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकलपिठाने हा आदेश दिला.
सौजन्य : सौजन्य : tv9 मराठी
‘एखाद्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या प्रश्नाविषयीची प्रकरणे न्यायालयाने तातडीने सुनावणीसाठी घ्यावीत’, अशी टिपणीही न्यायालयाने या वेळी केली. या प्रकरणी बदलापूर (पूर्व) पोलीस ठाण्यात वामन म्हात्रे यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वामन म्हात्रे यांनी २२ ऑगस्ट या दिवशी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या प्रकरणाचे अन्वेषण गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आले आहे. यामध्ये वामन म्हात्रे यांनी अटकपूर्व जामिनासाठी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता; मात्र त्यावर सुनावणी न झाल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.