बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराप्रकरणी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न, शाळेतील सीसीटीव्ही चित्रण गायब !

ठाणे – बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराची चौकशीसाठी शिक्षण विभागाने नेमलेल्या समितीने अहवाल सादर केला असून या अहवालामध्ये अत्याचार झालेल्या आदर्श शाळेतील मागील १५ दिवसांपासूनचे सीसीटीव्ही चित्रण गायब झाले आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी २६ ऑगस्ट या दिवशी कल्याण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावरून या प्रकरणी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचे उघड झाले आहे.

या वेळी दीपक केसरकर म्हणाले, ‘‘शाळेतील सेविकांवर मुलींना शौचालयात नेण्याचे आणि तेथून आणण्याचे दायित्व होते. त्या कामावर नसतांना हा प्रकार घडला. त्यामुळे अनुपस्थित असलेल्या २ सेविकांना सहआरोपी करण्याची शिफारस या चौकशी अहवालात करण्यात आली आहे. पीडित विद्यार्थिनींच्या वर्गशिक्षिका आणि मुख्याध्यापिका यांनी याविषयी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही अन् पोलिसांना घटनेची माहितीही दिली नाही. त्यामुळे त्यांच्यावर ‘पॉक्सो’अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची  शिफारस या अहवालात करण्यात आली आहे.’’