साष्टांग दंडवत !

गोलरक्षक पी.आर्. श्रीजेश (डावीकडे ) गोलपोस्टला साष्टांग दंडवत घालतांना (उजवीकडे)

भारताने पॅरिस ऑलिंपिकमध्ये हॉकी खेळात कांस्यपदक पटकावले. त्या वेळी सर्वांची दृष्टी वळली ती गोलरक्षक पी.आर्. श्रीजेशकडे ! कारण श्रीजेश यांचा हा अखेरचा सामना होता. भारताने कांस्यपदक जिंकून श्रीजेश यांना अविस्मरणीय भेट दिली; परंतु भारताने सामना जिंकल्यावर श्रीजेश यांनी त्यांच्या एका कृतीमुळे सर्वांचीच मने जिंकली. भारताचा विजय झाल्यानंतर श्रीजेश यांनी गोलपोस्टला साष्टांग दंडवत घालून नमस्कार केला. सर्वांसाठी हा भावूक क्षण होता आणि याच वेळी श्रीजेश यांनी या कृतीतून भारतीय संस्कृतीतून झालेले संस्कार सर्वांना दाखवून दिले. भारतीय हॉकीमधील सध्याच्या काळातील मोठे नाव श्रीजेश हे आहे. कांस्यपदकाच्या लढतीत त्यांच्या सर्वाेत्तम खेळाच्या जोरावर संघाला जिंकून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. आतापर्यंत अनेक सामन्यांमध्ये आणि स्पर्धांमध्ये त्यांनी त्यांचे बहुमूल्य योगदान देऊन भारताची मान उंचावली आहे. त्यामुळे निवृत्तीच्या सामन्याच्या वेळी सामना जिंकल्यानंतर ‘गोलपोस्ट’ला त्यांनी केलेला नमस्कार हे त्यांच्या विनम्रपणाचे आणि कर्तेपणा अर्पण करण्याच्या वृत्तीचे निर्देशक आहे.

आज अनेक खेळाडू पदक पटकावल्यावर, सामना किंवा स्पर्धा जिंकल्यावर आनंद साजरा करतांना बेभान झाल्याचे पहायला मिळते. काही वेळा तर ‘सेलिब्रेशन’ (जिंकल्याचा आनंद साजरा) करतांना वादग्रस्त कृतींमुळे ते लोकांच्या दृष्टीतून उतरतात आणि त्यांच्यावर टीकाही होते. त्या दृष्टीने विचार केल्यास गोलपोस्टला नमस्कार करण्याच्या श्रीजेश यांच्या कृतीचे पाश्चात्त्यांना नक्कीच आश्चर्य वाटले असणार. मागील वर्षी झालेली एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा जिंकल्यानंतर मिळालेल्या चषकासह छायाचित्र काढतांना ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मिशेल मार्श याने चषकावर पाय देऊन छायाचित्र काढले होते; याउलट काही मासांपूर्वी भारताने ‘२०-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा’ जिंकल्यावर भारताचा कर्णधार रोहित शर्मा यांनी खेळपट्टीला नमस्कार करून खेळपट्टीवरील कणभर माती चाखली. हॉकीतील पी.आर्. श्रीजेश असो अथवा क्रिकेटपटू रोहित शर्मा असो, त्यांच्या कृतीतून खेळाविषयीची त्यांची भावना, विनम्रता आणि कृतज्ञतेच्या जाणिवेचे दर्शन होते अन् ते सर्वांच्या मनाला भावते. हे संस्कार भारतीय संस्कृतीतून झालेले आहेत. कुठल्याही क्षेत्रात यशस्वी झाल्यानंतर ज्यांच्यामुळे आपण यशस्वी झालो, त्यांचे आपण आभार मानतो. भारतीय संस्कृती मात्र तेवढ्यापुरते सीमित न रहाता त्याही पुढे जाऊन आपण जिथे यशस्वी झालो, त्या सर्वांप्रती, अगदी निर्जीव वस्तूंप्रतीही कृतज्ञता व्यक्त करायला शिकवते. वरील दोन्ही खेळाडूंच्या वर्तनातून हेच शिकायला मिळते. यातूनच भारतीय संस्कृतीचे वेगळेपण आणि श्रेष्ठत्व सिद्ध होते !

– श्री. संदेश नाणोसकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.