१. साधना करण्यासाठी प्रथम अध्यात्माची तात्त्विक माहिती असणे आवश्यक असणे
‘अध्यात्माच्या संदर्भातील अनेक ग्रंथ बघून ‘संबंधित लेखक केवळ तात्त्विक माहितीपर ग्रंथ लिहिण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीच्या स्तरावरील, म्हणजेच साधनेच्या संदर्भातील ग्रंथ का लिहीत नाहीत ?’, असा प्रश्न मला नेहमी पडायचा. त्यानंतर अध्यात्माविषयीच्या तात्त्विक ग्रंथांचे महत्त्व लक्षात आणून देणारे पुढील विचार देवाने मला सुचवले.
अ. एखाद्या विषयाच्या संदर्भात माहिती झाली, तरच त्याविषयी जिज्ञासा निर्माण होते आणि त्यानंतर त्या विषयात रुची निर्माण होते. ही माहिती त्यासंदर्भातील ग्रंथवाचन किंवा इतरांकडून मिळालेली माहिती यांच्या आधारेच होते, उदा. एखाद्याला अक्षरओळख असेल, तरच तो आधुनिक वैद्य, अधिवक्ता, अभियंता इत्यादी बनू शकतो. यानुसार अध्यात्माची माहिती झाली, तरच तो मनापासून साधना करू शकतो.
अध्यात्माविषयीच्या ग्रंथलेखकांना विनंती !
‘वेद, पुराणे, भगवद्गीता, यांसारखे धर्मग्रंथ आणि ज्ञानेश्वरी, दासबोध, एकनाथी भागवत, यांसारखे ग्रंथ अध्यात्माची तात्त्विक माहिती सांगत असले, तरी ते प्रामुख्याने ‘साधना कशी करावी ?’, हाच भाग अधोरेखित करतात. त्यामुळे वरील लेख वाचल्यानंतर अध्यात्माच्या संदर्भातील ग्रंथ लिहिणार्या लेखकांनी त्यांच्या ग्रंथाच्या शेवटी वाचकांसाठी ‘ही तात्त्विक माहिती पुष्कळ वाचनीय असली, तरी खर्या साधकाने या माहितीनुसार प्रत्यक्ष कृतीला महत्त्व देणे आवश्यक आहे. त्यातूनच तुमची खरी आध्यात्मिक उन्नती होणार आहे’, अशा आशयाचे लिखाण प्रसिद्ध करावे’, अशी त्यांना विनंती आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
आ. ईश्वराच्या संदर्भातील तात्त्विक माहिती असेल, तरच जिज्ञासूच्या मनात ईश्वराला जाणण्यासाठी साधना करण्याबद्दलचे विचार येऊ लागतात. जिज्ञासू अनेक विचारांचे असतात. त्यांना साधनेबद्दल माहिती नसली, तरी ग्रंथांमुळे ही तात्त्विक माहिती मिळाल्यावर पुढे ते साधना करण्यास आरंभ करतात.
इ. भारतात पिढ्यान्पिढ्या चालू असणार्या पूजा, प्रवचने, कथा-कीर्तने, यांसारख्या विविध माध्यमांतून बर्याच जणांना अध्यात्माची तोंडओळख होत असते; परंतु या विषयांच्या संपर्कात नसणारे, तसेच विदेशातील लोक यांना अध्यात्माविषयी काहीच माहिती नसल्यामुळे ते साधनेकडे वळण्याची शक्यता अल्प असते. त्यांच्यासाठी अध्यात्माविषयीचे ग्रंथच मार्गदर्शक ठरतात.
ई. एखाद्याने गेल्या जन्मी साधना केलेली असेल, तरच तो या जन्मी साधना करू शकतो. ज्याने यापूर्वी कधीच साधना केलेली नाही, त्याने अध्यात्माचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्याच्यासाठी अध्यात्माच्या संदर्भातील तात्त्विक ग्रंथ उपयुक्त ठरतात.
उ. अध्यात्माची योग्य माहिती नसतांना एखाद्याने अनेक वर्षे चुकीच्या पद्धतीने साधना केली, उदा. चुकीचा नामजप करणे, तर त्याची आध्यात्मिक प्रगती होणार नाही. यासाठीही अध्यात्माचा अभ्यास करणे आवश्यक ठरते.
२. अध्यात्माच्या संदर्भात साधक-लेखकाच्या ग्रंथांचा अभ्यास करावा !
साधना केलेल्या व्यक्तीने लिहिलेले ग्रंथ वाचणे योग्य ठरते. साधना न करता केवळ पांडित्याच्या आधारे लिहिलेल्या ग्रंथांमुळे ग्रंथाचा लेखक आणि वाचक या दोघांचेही आयुष्य वाया जाते.
३. अध्यात्माच्या तात्त्विक माहितीपेक्षा प्रत्यक्ष साधना करणे खरे महत्त्वाचे !
अध्यात्माविषयीच्या तात्त्विक माहितीचे वरील महत्त्व बघितले, तरी याचा अर्थ ‘आयुष्यभर अध्यात्माचा अभ्यास केला पाहिजे’, असे नाही. या माहितीला केवळ २ टक्के महत्त्व असते आणि प्रत्यक्ष साधना करण्याच्या कृतीला ९८ टक्के महत्त्व असते, उदा. आयुष्यभर दासबोधाचा अभ्यास केला, तरी तो कृतीत आणणे आवश्यक असते. ‘ही प्रत्यक्ष कृती, म्हणजेच साधना कशी करायची ?’, हे सनातनच्या अनेक ग्रंथांत दिले आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले