Al Qaeda Terrorists Camp : पोलीस ठाण्यापासून ७०० मीटर अंतरावर होता अल्-कायदा या आतंकवादी संघटनेचा शस्त्रसाठा !

  • भिवडी (राजस्थान) येथील घटना

  • देहली पोलिसांनी कारवाई केल्यावर उघड झाली माहिती !

शस्त्रसाठा मिळालेली जागा

अलवर (राजस्थान) – जिल्ह्यातील भिवडी येथे अल्-कायदाचे प्रशिक्षण शिबिर चालू असल्याची माहिती नुकतीच उघड झाली. २२ ऑगस्टला देहली पोलिसांनी मोठी कारवाई करत ६ संशयित लोकांना अटक केली होती. विशेष असे की, पोलिसांनी संशयास्पद व्यक्तींच्या लपण्याच्या ज्या जागेवर धाड घातली, ती जागा पोलीस ठाण्यापासून अवघ्या ७०० मीटर अंतरावर आहे. हे संशयित जंगलातील टेकडीवर शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण घेत होते.

अशातच राजस्थान पोलिसांना या आतंकवादी कारवायांचा कोणताही सुगावा न लागल्यामुळे अनेक मोठे प्रश्‍न निर्माण होत आहेत. देहली पोलिसांनी कारवाई केल्यानंतरच राजस्थान पोलिसांना अल् कायदासारख्या आतंकवादी संघटना राजस्थानमध्ये सक्रीय असल्याची माहिती मिळाली. हे स्वत: राज्याचे पोलीस महासंचालकांनीही मान्य केले आहे. ते म्हणाले की, संशयित व्यक्तींचा राजस्थानशी काय संबंध आहे ?, याचा तपास करण्यात येत आहे.

भिवडी येथील आतंकवादी तळासंदर्भात अनेक धक्कादायक खुलासे झाले असून संशयित व्यक्ती भाड्याच्या खोलीत रहात होत्या; त्या खोल्यांमधून पोलिसांना अवैध शस्त्रे, दारूगोळा आणि आतंकवादी विचारसरणीची पुस्तकेही सापडली आहेत.  आजूबाजूला रहाणार्‍या लोकांच्या म्हणण्यानुसार येथे फारसे कुणी येत नव्हते.

संपादकीय भूमिका

पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घडणार्‍या गुन्ह्यांचाही सुगावा लागू न  शकणार्‍या पोलिसांना दुर्गम भागातील गुन्ह्यांचा सुगावा कधी लागेल का ? हे पोलिसांना लज्जास्पद ! असे पोलीस जनतेचे रक्षण काय करणार ?