मी सातारा येथे काही कामानिमित्त गेलो होतो. संध्याकाळी पुणे येथे परतीचा प्रवास करतांना आलेला अनुभव देत आहे. यातून बोध घेऊन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एस्.टी.ने) कार्यपद्धतीत काही पालट केल्यास सामान्य जनतेला त्याचा लाभ होईल आणि परिवहन महामंडळाचे उत्पन्न वाढेल.
१. हा अनुभवकथन करण्यापूर्वी थोडे…
सध्याची जागतिक स्थिती आणि गतीमान कालचक्र यांचा अभ्यास करता, सर्वत्र चालू असणार्या स्पर्धा आणि त्यामुळे त्यामध्ये टिकून रहाण्यासाठी चालू असणारी धडपड पहाता प्रत्येक आस्थापन त्यांच्या वस्तूंच्या किंमती अल्प रहातील, दर्जा कायम कसा राहील ? यासाठी नवीन नवीन उपाय शोधतात. व्यवस्थापनातील असणार्या त्रुटी न्यून करण्याचा नियमितपणे प्रयत्न करतात. अशा प्रकारे परिवहन खात्याचे प्रयत्न कुठे होत असतील; पण तसे वाटत नाही. परिवहन खात्यानेसुद्धा काही सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस प्रवासी एस्.टी.मधून प्रवास करण्यास प्राधान्य देत असल्याचे जाणवते. यामुळेच एस्.टी. बसस्थानक गर्दीने तुडुंब भरलेली पहायला मिळतात. एकीकडे असे दृश्य आहे आणि दुसरीकडे मात्र प्रवाशांना बस वेळेत न मिळाल्याने काही घंटे ताटकळत बसावे लागण्याचा अनुभव येत आहे. या व्यवस्थेत सुधारणा झाल्यास नक्कीच एस्.टी.ला अजून चांगले दिवस येतील.
२. प्रवासाचे तिकीट मिळण्याविषयी गैरसोय !
मी सातारा ते पुणे असा प्रवास करण्यासाठी सातारा बसस्थानकात पोचलो. त्या वेळी बाहेरगावाहून येणार्या आणि पुणे, मुंबई येथे जाणार्या गाड्यांना प्रचंड गर्दी असल्याने यातून जाणे शक्य नसल्याने मी ‘स्वारगेट-पुणे’ या विनावाहक, विनाथांबा गाडीने प्रवास करण्याचे ठरवले. प्रत्येक १५ मिनिटे ते ३० मिनिटे या अंतराने ही गाडी सुटते. ही गाडी जेथून सुटते, त्या ठिकाणी आल्यावर असणारी मोठी रांग पाहून मनात प्रश्न निर्माण झाला की, आपण अन्य काही पर्याय निवडूया का ? पण तसे शक्य नसल्याने मी संध्याकाळी ६.१५ वाजता रांगेत उभा राहिलो. या ठिकाणी साधारणपणे १५ मिनिटांनी गाडी असते आणि तिकीट देण्यासाठी स्वतंत्र खिडकी आहे. येथूनच तिकीट घेऊन गाडीत बसता येते. वस्तूतः माझ्या पुढे साधारणपणे १७० प्रवासी उभे होते आणि त्यांतील काही जणांसमवेत त्यांचे असणारे नातेवाईक ! एका गाडीमध्ये आसन क्षमतेनुसार अधिकाधिक ४० प्रवाशांना तिकीट दिल्यावर गाडी सुटत होती. जी गाडी भरली जात आहे, ती सुटण्यापूर्वीच दुसरी गाडी त्या ठिकाणी येत होती; परंतु ती त्याच ठिकाणी उभी केली जात होती. तिकीट देण्यासाठीच अधिकाधिक वेळ लागत असल्याचे माझ्या लक्षात आले. या प्रक्रियेमुळे मला गाडी मिळण्यासाठी रांगेत उभे राहून १ घंटा ३५ मिनिटे प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर ६ व्या गाडीत मला जागा मिळाली.
३. वेळेचा होणारा अपव्यय !
यामध्ये महत्त्वाचे म्हणजे विनावाहक, विनाथांबा गाडी सुटल्यावर ती पोचण्यास जो वेळ लागला, तो अडीच घंटे, म्हणजे अडीच घंट्याच्या प्रवासासाठी रांगेत उभे राहून करावी लागणारी प्रतीक्षा ही प्रवासाला लागणार्या वेळेच्या ६० टक्के आहे, असे अभ्यास केल्यावर लक्षात आले. सध्याच्या स्थितीचा विचार केल्यास अशा प्रकारांमुळेच जनता एस्.टी.ने प्रवास करण्यास सिद्ध होत नाही. याखेरीज या सर्व प्रक्रियेचा विचार केल्यास दरडोई उत्पन्न जरी वाढले, तरी दरडोई होणारा व्यय न्यून न होता तो तसाच राहिल्याने एस्.टी.ला लाभसुद्धा होणार का ? हा आणखी एक प्रश्न आहे.
या वेळी अनुभवलेला अजून काही भाग असा होता की, तेथे रांगेतील प्रवाशांना शिस्त आणण्यासाठी आणि कोणतेही वादविवाद होऊ नयेत, यासाठी सुरक्षारक्षक दिसला नाही. जो सुरक्षारक्षक तिकीट विक्री कक्षाजवळच उभा होता. या व्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिक, महिला यांना सवलत दिली जाते; पण या ठिकाणी अशी कोणतीही सुविधा दिसली नाही. त्यामुळे सर्वच प्रवासी एकाच रांगेत उभे तर होते; पण अधूनमधून मध्येच कुणीतरी घुसून कुणाला तरी सांगून तिकिटे घेत होते.
या सर्व परिस्थितीमुळे मला सातारा ते स्वारगेट या प्रवासाला एकूण ४ घंटे लागले. मग विनावाहक, विनाथांबा असल्याने लवकर प्रवासाचा काहीच लाभ तर झाला नाही, उलट अधिक वेळ लागल्याने स्वारगेटच्या पुढे मला माझ्या इच्छितस्थळी जाण्यासाठी बस मिळाली नाही, तर कसे जायचे ? हा प्रश्न निर्माण झाला होता.
– श्री. सुनील ओजाळे, चिंचवडगाव, जिल्हा पुणे.
साधक, वाचक, धर्मप्रेमी, राष्ट्रप्रेमी, हितचिंतक आणि अर्पणदाते यांच्यासाठी सूचनास्वतःचे अनुभव कळवण्यासाठी आणि मोहिमेत सहभागी होण्यासाठी पत्ता या लेखात म्हटल्याप्रमाणे आणि त्याहीपेक्षा वेगळ्या अशा एस्.टी.विषयी अनेक समस्या वा अनुभव असू शकतात. याविषयी तुमचे काही अनुभव असल्यास पुढील पत्त्यावर कळवा. सुराज्य अभियानटपालाचा पत्ता : श्री. अभिषेक मुरकटे, ‘सुखठणकर रिट्रिट’, फ्लॅट क्र. एजी-४, चित्तार भाट, नागेशी, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१ संपर्क : 9867558384 संगणकीय पत्ता : [email protected] |