१. मायेचे आवरण नष्ट करण्यासाठी गुरुमाऊलीला आर्ततेने हाक मारणे
‘एकदा मी दैवी बालसाधकांच्या सत्संगात भावजागृतीचा प्रयोग सर्व बालसाधकांना करण्यास सांगितला. आपण सर्वांनी डोळे मिटूया आणि डोळे मिटलेल्या स्थितीत आपण काय अनुभवत आहोत’, ते अंतर्मनात डोकावून बघूया. आपल्यावर मायेचे आवरण आले आहे. अहं, स्वकौतुक आणि कर्तेपणा अशा विचारांचे ते आवरण आहे. ते आवरण नष्ट होण्यासाठी आपला अंतरात्मा ‘श्री गुरवे नमः । श्री गुरुदेव शरणं मम । श्री गुरुदेव शरणं मम ।’ अशी आर्त हाक गुरुमाऊलीला (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) घालत आहे. संपूर्ण ब्रह्मांडाची माऊली असणार्या आपल्या गुरुमाऊलींना आपली हाक नक्कीच पोचणार आहे.
२. श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे मोरपिसाने नामजपाचे मंडल बनवणे
आता आपली हाक गुरुदेवांपर्यंत पोचली आहे. आपल्या हातात एक मोरपीस देऊन ते आपल्याला म्हणत आहेत, ‘बाळा, या मोरपिसाने तू नामजप लिही. एक नामजप झाला की, एक ठिपका काढून तू तुझ्याभोवती पिवळ्या रंगाच्या ठिपक्यांचे मंडल बनव. यामुळे तुझ्याभोवती चैतन्याचे कवच निर्माण होऊन तुझ्या अंतर्मनावर अनिष्ट शक्तींच्या आवरणाचा परिणाम होणार नाही.’ आपण गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे मोरपिसाच्या साहाय्याने ठिपक्यांचे मंडल काढत ‘श्री गुरवे नमः । श्री गुरुदेव शरणं मम ।’ हा नामजप करत आहोत. गुरुदेव आपल्यावर आलेल्या आवरणाचा एक एक धागा काढून नष्ट करत आहेत. आता आपल्यावरील सर्व आवरण निघून गेले आहे.
३. गुरुदेवांनी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या माध्यमातून पाठवलेल्या भक्तीभाव आणि चैतन्य यांच्या दोराला धरून गुरुदेवांच्या चरणांजवळ पोचणे
गुरुदेवांनी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून आपल्याकडे भक्तीभाव आणि चैतन्य यांचे दोर सोडले आहेत. गुरुदेव आपल्याला सांगत आहेत, ‘या दोरांना पकडून तुम्ही वर माझ्यापर्यंत या. वर येतांना मागे ‘भूतकाळाकडे बघू नका. वर्तमानात रहा’, असे सांगून गुरुदेवांनी ते दोर श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या हातात दिले. त्या दोरांवरही सूक्ष्मातून ‘श्री गुरुदेव शरणं मम । श्री गुरुदेव शरणं मम ।’ हा नामजप लिहिला होता. आपण त्या दोरांना धरले आहे. प्रथम आपल्याला भीती वाटली; पण गुरुदेव आपल्याला आश्वस्त करत आहेत,
‘मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही केवळ या.’ आता श्री गुरुदेवांचा धावा करत आपण त्यांच्या चरणांजवळ पोचलो.
४. गुरुदेवांजवळ पोचल्यावर साधकाचे रूपांतर पारिजातकाच्या फुलामध्ये होणे, श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी ते फूल गुरुदेवांच्या चरणांवर अर्पण केल्यावर फुलाला निर्विचार अवस्था अनुभवता येणे
गुरुदेवांच्या चरणांजवळ पोचल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी आपल्याला हात देऊन वर घेतले आहे. त्यांनी आपल्याला हात लावल्यावर आपले रूपांतर पारिजातकाच्या फुलामध्ये झाले आहे. दोघींनी हे फूल गुरुदेवांच्या चरणी अर्पण केले आहे. गुरुदेवांच्या चरणी अर्पण होताच ते फूल गुरुदेवांच्या चरणांमध्ये सामावून गेले आहे. त्या ठिकाणी फुलाला आनंदी आणि निर्विचार अवस्था अनुभवता येत आहे. आतमध्ये एवढा आनंद आहे की, त्याची तुलना कुठेच होऊ शकत नाही. अशा त्या आनंदात आपण गुरुदेवांची स्तुती करत आहोत.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ।।
गुरुदेवांमध्ये आपल्याला त्रैलोक्याचे दर्शन झाले आहे. अलौकिक असे ते दर्शन घेऊन आपले मन भावविभोर झाले आणि ‘गुरुचरणी संपूर्ण कृतज्ञतेने शरण जाऊन ‘कृतज्ञता कृतज्ञता, अखंड कृतज्ञता’, असे म्हणू लागले.’
– सौ. निवेदिता योगेंद्र जोशी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ५२ वर्षे), नंदुरबार
|