पुणे येथे रुद्र अभिषेक करण्यास विरोध केल्याचे प्रकरण !
पुणे – सातारा रस्त्यावरील सद्गुरु शंकरबाबा महाराज मठामध्ये ‘रुद्र अभिषेक’ करण्यासाठी विरोध करणे, जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण करणे या प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, अथर्व शिळीमकर, अर्चित शिळीमकर आणि महेश शिळीमकर यांच्या विरोधात अनुसूचित जाती-जमाती संरक्षण कायद्यानुसार सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या विरोधात चेतन आरडे यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. २० जून या दिवशी घटना घडली होती.
आरडे यांनी घटना घडतांना पोलिसांना संपर्क करूनही पोलीस आले नाहीत. पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यासाठी गेल्यावर अधिकार्यांनी जबाब वा तक्रार घेतली नाही. त्यामुळे आरडे गेल्या ५ दिवसांपासून पुणे समाज कल्याण विभागासमोर उपोषणास बसले होते. (गुन्हा नोंदवण्यासाठी नागरिकांना उपोषण का करावे लागते ? पोलिसांना ते लक्षात का येत नाही ? – संपादक) उपोषणाची नोंद घेत पोलिसांनी माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची कारवाई केली.