US Role : शेख हसीना यांना पदच्‍युत करण्‍यात अमेरिकेचा सहभाग नाही ! – कॅरिन जीन पियरे

अमेरिकेने दिले स्‍पष्‍टीकरण

डावीकडून कॅरिन जीन पियरे आणि शेख हसीना

वॉशिंग्‍टन (अमेरिका) – अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्षीय कार्यालय असलेल्‍या व्‍हाईट हाऊसच्‍या प्रसारमाध्‍यम सचिव कॅरिन जीन पियरे यांनी पत्रकार परिषदेत शेख हसीना यांना पदच्‍युत करण्‍यात अमेरिकेचा सहभाग नाही, असे म्‍हटले आहे. ‘जर मी बांगलादेशातील सेंट मार्टिन बेटावरील नियंत्रण सोडले असते आणि अमेरिकेला बंगालच्‍या उपसागरावर वर्चस्‍व प्रस्‍थापित करण्‍याची अनुमती दिली असती, तर मी सत्तेत राहिले असते’, असा आरोप बांगलादेशाच्‍या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी केला होता. हा आरोप पियरे यांनी फेटाळून लावला आहे. त्‍यांनी म्‍हटले, ‘बांगलादेशातील राजकीय अस्‍थिरतेमध्‍ये आमचा कोणताही सहभाग नाही. या घटनांमध्‍ये अमेरिकी प्रशासनाचा सहभाग असल्‍याच्‍या बातम्‍या पूर्णपणे खोट्या आहेत.’

कॅरिन जीन पियरे यांनी पुढे म्‍हटले की, बांगलादेशातील लोकांचे भविष्‍य ठरवणे, हा त्‍यांचा विशेषाधिकार आहे. त्‍यांच्‍या नेत्‍याची निवड करणे बांगलादेशी जनतेने त्‍यांच्‍यासाठी घेतलेला महत्त्वाचा निर्णय आहे. बांगलादेशच्‍या जनतेने त्‍यांच्‍या सरकारचे भवितव्‍य ठरवावे, असे आमचे मत आहे. कोणत्‍याही प्रकारच्‍या आरोपांवर आम्‍ही हेच सांगू की, त्‍यात अजिबात तथ्‍य नाही.

शेख हसीना यांच्‍या मुलानेही अमेरिकेविषयीचा दावा फेटाळला

दुसरीकडे शेख हसीना यांचे पुत्र सजीब वाजेद यांनीही ‘माझ्‍या आईने असे कोणतेही वक्‍तव्‍य केलेले नाही. आईने मला सांगितले की, तिने ढाका सोडण्‍यापूर्वी किंवा नंतर कोणतेही वक्‍तव्‍य दिलेले नाही’, असे स्‍पष्‍टीकरण दिले आहे.

संपादकीय भूमिका

अमेरिकेचा इतिहास आणि वर्तमान पहाता यावर कोण विश्‍वास ठेवणार ? अमेरिका कधीही ‘तिचा यात हात होता’, हे स्‍वीकारणार नाही !