थोडक्यात


कल्याण येथे अल्पवयीन मुलाची आत्महत्या !

कल्याण –  येथील ‘आयडियल’ शाळेतील ८ वीमध्ये शिकणार्‍या विघ्नेश पात्रो (वय १२ वर्षे) याने ११ ऑगस्टला घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी विघ्नेशने एक चिठ्ठी लिहली होती. शाळेतील एका शिक्षिकेकडून होत असणार्‍या त्रासाची माहिती चिठ्ठीत लिहून त्याला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.

संपादकीय भूमिका
मुलांचे मनोबल वाढण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणे आवश्यक !

 

चारचाकीच्या धडकेत ३ विद्यार्थी घायाळ !

 कल्याण –  येथील पत्रीपूल येथून मलंग रस्ता भागात असलेल्या आपल्या शाळेत पायी चालले जाणार्‍या ३ विद्यार्थ्यांना भरधाव वेगात येणार्‍या चारचाकीने धडक दिली. यामुळे तिघे जण गंभीर घायाळ झाले. चारचाकी चालकाने तिन्ही विद्यार्थ्यांना रुग्णालयात भरती केले. उपचारानंतर विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले.


आजीचे निवृत्तीवेतन मिळवण्यासाठी हाणामारी !

कल्याण – कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून सेवानिवृत्त झाल्याने आजींची निवृत्तीवेतनाची रक्कम पालिकेकडून अधिकोषात पाठवण्यात आली होती. या निवृत्तीवेतनावर आजीच्या भावाची मुले आणि आजीचे सख्खे नातू यांच्यात हक्क सांगत अधिकोषातच वाद चालू झाला. बँक कर्मचार्‍यांनी त्यांना समज देत बँकेबाहेर काढले होते; मात्र बँकेच्या गेटमध्येच आजीच्या भावाच्या मुलांनी आजीच्या सख्ख्या नातवांवर चाकूने आक्रमण केले आणि ते पसार झाले. यात दोघे जण घायाळ झाले. (समाजातील वाढती हिंसकवृत्ती दर्शवणारी घटना ! – संपादक)


बनावट विदेशी मद्याचा साठा कह्यात

धुळे – संपूर्ण जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि  वाहतूक यांच्या विरुद्ध कारवाईस प्रारंभ केला आहे. ११ ऑगस्टला जिल्ह्यातील वाकपाडा शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने घातलेल्या धाडीत बनावट विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत २४ लाख ७२ सहस्र ५४० रुपयांच्या मुद्देमालासह संशयित अमोल पाटील यांना अटक करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका
बनावट मद्याची निर्मिती करणार्‍यांचा शोध घेऊन त्यांनाही कठोर शिक्षा करावी !

 

ट्रकने चिरडल्याने महिलेचा मृत्यू !

गोंदिया –  शहरातील राणी अवंतीबाई चौकात १२ ऑगस्टला सकाळी अल्विना जेम्स लुईस (वय ३१ वर्ष) या शिक्षिकेच्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ट्रकने महिलेला काही अंतरापर्यंत चिरडत नेले होते. अंभोरा येथील शाळेमध्ये जात असतांना हा अपघात झाला. चौकात लावलेल्या अवैध फलकामुळे वळण घेतांना पुढील रस्ता दिसत नाही. त्यामुळेच हा अपघात झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी ट्रक आणि चालक यांना कह्यात घेतले आहे.

संपादकीय भूमिका
अजून किती मृत्यू झाल्यानंतर प्रशासन उपाययोजना काढणार ?