कोची (केरळ) – केरळमधील हिंदू हे कर्क अमावास्येला सर्व पितरांसाठी श्राद्ध आणि तर्पण करतात. या वेळी हिंदू हे मोठ्या संख्येने हिंदु मंदिर, समुद्रकिनारी किंवा नदीच्या काठावर जमून श्राद्ध करतात. ‘केरळ हिंदु सोसायटी मेलबर्न कॉर्पाेरेशन’, या ऑस्ट्रेलियामधील केरळमधील हिंदूंच्या संघटनेने हिंदूंना ‘श्राद्धाचे महत्त्व आणि शास्त्र’ समजावे, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ऑनलाईन प्रवचन घेण्याची व्यवस्था केली. सनातन संस्थेच्या सुश्री (कु.) रश्मी परमेश्वरन् यांनी मल्याळम् भाषेत वरील विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी ‘श्राद्ध कर्माला देवकर्मापेक्षाही अधिक महत्त्व आहे, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. श्राद्धविधीमुळे पितृ तृप्त होऊन कुटुंबाला आशीर्वाद देऊन पुढच्या लोकात जातात’, असे सांगितले. या वेळी सुश्री (कु.) परमेश्वरन् यांनी ‘श्राद्धविधीत करावयाच्या कृती, ‘श्री गुरुदेव दत्त’ नामाचे महत्त्व’, या सूत्रांवरही जिज्ञासूंना मार्गदर्शन केले. या प्रवचनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी जिज्ञासूंनी ऑनलाईन साप्ताहिक सत्संग चालू करण्याची मागणी केली.