सिंधुदुर्ग – पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी जिल्ह्यात १२, १३ आणि १४ ऑगस्ट या दिवशी ‘जनता दरबारा’चे आयोजन केले आहे. या अंतर्गत १२ ऑगस्ट या दिवशी झालेल्या जनता दरबाराच्या पहिल्या दिवशी कणकवली विधानसभा क्षेत्रातील नागरिकांकडून विविध प्रकारच्या समस्यांचे ७८ अर्ज आले होते. त्यापैकी ७४ अर्जांचे निराकारण करण्यात आले. सिंधुदुर्गात ‘मुख्यमंत्री – लाडकी बहीण योजने’चे १ लाख ४४ सहस्र ८७४ अर्ज पात्र ठरले आहेत, अशी माहिती देण्यात आली.
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात पालकमंत्री रविंद्र चव्हाण, कणकवलीचे आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्यासह प्रमुख अधिकार्यांच्या उपस्थितीत हा जनता दरबार झाला.
‘जनतेचे प्रलंबित प्रश्न सुटावेत, यासाठी जनता दरबार घेण्याचे निश्चित केले. राज्यात अनेक प्रलंबित विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांच्या नेतृत्वाखाली मार्गी लावले जात आहेत. विविध योजना आणल्या जात आहेत. जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याची सरकारची भूमिका असतांना प्रशासन ठप्प आहे. ते काम करत नाही, अशी टीका केली जाते. त्यामुळे प्रशासन गतीमान करण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. येथे मांडण्यात आलेल्या प्रश्नांच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकार्यांनी प्रतिदिन आढावा घ्यायचा आहे’, असे पालकमंत्री चव्हाण यांनी या वेळी सांगितले.
कातकरी बांधवांच्या घरांचा प्रश्न निकाली
जिल्ह्यातील कातकरी समाजाच्या घरांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. वारंवार पाठपुरावा करून, तसेच निवेदन देऊनही घरकुलाच्या प्रश्नाची नोंद घेतली जात नव्हती; परंतु ‘जनता दरबारा’त या समस्येचे गांभीर्य ओळखून पालकमंत्री चव्हाण यांनी ७० कातकरी बांधवांना घरांसाठी ओसरगांव येथील भूमी देण्याचा निर्णय घेतला. तसेच याविषयीची पुढील प्रक्रिया तातडीने करावी, असा आदेश जिल्हाधिकार्यांना दिला. यामुळे कातकर्यांनी मंत्री चव्हाण यांचे आभार मानले.