पुणे येथील कल्याणीनगरमधील ‘पोर्शे’ कार अपघात प्रकरण !
पुणे – कल्याणीनगर येथील ‘पोर्शे’कार अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने पालटल्याच्या प्रकरणात डॉ. श्रीहरि हाळनोर यांनी अडीच लाख रुपये घेतले होते. त्यांनी ते पैसे एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याकडे ठेवण्यासाठी दिले होते. ‘डॉ. अजय तावरे यांच्यामुळे मला पैसे मिळाले आहेत. माझ्याकडे कपाट नसल्याने तुझ्याकडे पैसे ठेव. १५ दिवसांनी मी पैसे परत घेईन, असे डॉ. हाळनोर यांनी सांगितले होते, असा जबाब त्या विद्यार्थ्याने पोलिसांसमोर दिला आहे. याविषयी माहिती विशेष सरकारी अधिवक्ता शिशिर हिरे यांनी न्यायालयात दिली. विशेष न्यायाधीश यू.एम्. मुधोळकर यांच्या न्यायालयासमोर ‘पोर्शे’ कार अपघात प्रकरणाची सुनावणी ८ ऑगस्ट या दिवशी झाली.
अधिवक्ता हिरे पुढे म्हणाले, ‘‘ज्या वेळी अपघात झाला, त्या वेळी कार चालवणारा अग्रवाल यांचा मुलगा उभा रहाण्याच्या स्थितीत नव्हता. डॉ. हाळनोर यांनी मात्र ‘मुलगा मद्याच्या अमलाखाली नव्हता’, असे अहवालामध्ये नमूद केले आहे. ‘ससून’मधील प्रशिक्षणार्थी महिला आधुनिक वैद्यांनी सांगितले की, डॉ. हाळनोर यांनी मुलाच्या आईचे रक्त घेण्यास सांगितले होते. त्यानुसार त्या महिलेचे रक्त घेतले. अन्य एका आधुनिक वैद्याने कार चालवणार्या मुलासमवेतच्या इतर मुलांचे रक्ताचे नमुने न घेता दुसर्यांचेच घेतले. हे सर्व डॉ. हाळनोर यांनी करण्यास सांगितले होते.
रक्ताच्या नमुन्यांचा पालटही डॉ. तावरे आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या सांगण्यानुसार करण्यात आला, असेही हिरे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.