बांगलादेशामधील हिंसाचारात आतापर्यंत ३०० लोकांचा मृत्‍यू

देशात अनिश्‍चित काळासाठी संचारबंदी लागू !

ढाका (बांगलादेश) – आरक्षणाच्‍या सूत्रावरून बांगलादेशामध्‍ये पुन्‍हा एकदा हिंसाचार चालू झाला आहे. ४ ऑगस्‍टला झालेल्‍या हिंसाचारात ९१ जणांचा मृत्‍यू झाला. आतापर्यंत ३०० हून अधिक लोकांचा मृत्‍यू झाला आहे. यात १४ पोलिसांचाही समावेश आहे. या हिंसाचारामुळे देशात अनिश्‍चित काळासाठी संचारबंदी लावण्‍यात आला आहे. तसेच इंटरनेटही बंद करण्‍यात आले आहे. याखेरीज ३ दिवसांची सुटी घोषित करण्‍यात आली आहे. आंदोलन करणारे पंतप्रधान शेख हसीना यांचे त्‍यागपत्र मागत आहेत. भारताने येथील भारतीय नागरिकांसाठी हेल्‍पलाईन क्रमांक प्रसारित केला आहे. भारतियांना घराबाहेर न पडण्‍याच्‍या सूचना केल्‍या आहेत.

सत्ताधारी अवामी लीग यांचा विरोधी पक्ष बी.एन्.पी. अन् जमात-ए-इस्‍लामी यांच्‍या कार्यकर्त्‍यांत हिंसाचार

आंदोलकांनी नरसिंगडी जिल्‍ह्यात अवामी लीगच्‍या ६ कार्यकर्त्‍यांची हत्‍या केली. ५० जिल्‍ह्यांत अवामी लीगच्‍या कार्यालयांची तोडफोड केली. देशात एकूण ६४ जिल्‍हे आहेत. मंत्री मोहिबुल हसन आणि रेजुल यांच्‍या घरांना बी.एन्.पी.च्‍या कार्यकर्त्‍यांनी पेटवून दिले. अवामीच्‍या विद्यार्थी संघटनेने बी.एन्.पी. नेते आमिर खुसरो यांच्‍या घरावर आक्रमणे केले. आंदोलकांनी पोलीस ठाण्‍यांसह सत्तारुढ पक्षाचे कार्यालय आणि त्‍यांच्‍या नेत्‍यांच्‍या घरांवर आक्रमणे केली. अनेक वाहने जाळली.

बांगलादेश सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या ४ न्‍यायमूर्तींच्‍या वाहनांवरही आंदोलकांनी आक्रमण केले. त्‍यांच्‍या वाहनांवर दगडफेक करण्‍यात आली. त्‍या सर्वांना पोलीस सुरक्षेत घरी नेण्‍यात आले.न्‍यायमूर्ती, मंत्री तसेच इतर उच्‍चाधिकार्‍यांच्‍या निवासस्‍थानी अतिरिक्‍त सुरक्षा तैनात केली आहे. आतापर्यंत ११ सहस्रांपेक्षा अधिक लोकांना अटक करण्‍यात आली आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी ४ ऑगस्‍टला सेक्‍युरिटी कौन्‍सिलची आणीबाणीची बैठक आयोजित केली. त्‍यात त्‍यांनी म्‍हटले की, आंदोलकांनी चर्चा करावी. विरोधक आंदोलनाआडून हिंसाचार करत आहेत.

धर्मांध मुसलमानांकडून इस्‍कॉन आणि काली मंदिर यांवरही आक्रमणे

आंदोलन करणार्‍यांपैकी धर्मांध मुसलमानांनी हिंदूंच्‍या घरांवर आणि त्‍यांच्‍या मंदिरांवरही आक्रमणे केली. ढाक्‍यातील इस्‍कॉन आणि काली मंदिरांसह हिंदूंच्‍या घरांनाही लक्ष्य करण्‍यात आले.

बांगलादेशात यापूर्वी होते सैन्‍याचे हुकूमशाही सरकार

वर्ष १९७१ मध्‍ये बांगलादेशाच्‍या स्‍थापनेनंतर वर्ष १९७५ ते १९९१ पर्यंत झिया उर रहमान, इर्शाद आदी सैन्‍याधिकार्‍यांचे हुकूमशाही सरकार होते. त्‍यानंतर पुन्‍हा लोकशाही मार्गाने सरकार स्‍थापन करण्‍यात आले.