पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘भारतीय स्त्रीविषयी हिंदुद्वेष्ट्यांकडून चुकीचा प्रचार, स्त्रियांसमोर असलेल्या आपत्ती, स्त्रीचे वैवाहिक जीवन आणि गर्भारपण, द्रव्यलालसेपोटी हुंडा मागणे अन् स्वतः निवड करूनही पाश्चात्त्य देशांत घटस्फोटांचे प्रमाण अधिक, तर भारतात ते न्यून का ? आणि विवाहाचा वैविध्यपूर्ण परिणाम’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत. (लेखांक ३०)
मागील लेखांक २९ लेख येथे वाचा :- https://sanatanprabhat.org/marathi/820762.html
१. विवाह जुळवण्यापूर्वी पाहिली जाणारी काही तत्त्वे !
१ अ. दोन्ही घरांची आर्थिक स्थिती : ही सामान्यतः जवळपासची हवी. एक अतीश्रीमंत आणि एक अतीदरिद्री हे केवळ चित्रपटातच शोभते; पण व्यवहारात नाही. मुलगी गरीब कुटुंबातील असेल, तर तिला अनेक जणांकडून अपमान सहन करावा लागतो. काही वेळा बोलण्यातून तिच्या माहेरचा उद्धार केला जातो. उलट मुलगा गरीब असेल, तर पुढे जीवनभर तिच्या अपेक्षा पूर्ण न होण्याने ती पदोपदी दुःखी होते.
१ आ. सांस्कृतिक उंची : एखाद्या घरात शिवी किंवा अभद्र शब्द कुणाच्या तोंडून निघत नाही; परंतु काही घरांतून गलिच्छ शिव्यांची लाखोली वाहिली जात असते. अशा विजोड दर्जाच्या कुटुंबांतील व्यक्तींचे लग्न होऊ नये.
१ इ. खाणे-पिणे : आपल्या देशात मांसाहारी आणि शाकाहारी असे सर्व लोक आहेत. जन्मतः मांसाहार न केलेल्या मुलीला ते अन्न स्वीकारायला जड जाईल. तसे दर्शवले, तरी तिच्या जातीचा उद्धार झाल्याविना रहाणार नाही. कित्येक कुटुंबांत दारू पिणे सर्रास चालते. निर्व्यसनी व्यक्तीने अशा घरांत मुळीच संबंध ठेवू नयेत.
१ ई. कुळ : सामान्यतः असे सर्व समान आचार, समान आहार, समान वागणूक, समान खानपान हे आपल्याच जातीत संभवते. जात म्हणजे कुटुंबांचे कुटुंब. ‘कां सुकुळीनें आपुली । आत्मजा सत्कुळींचि दिधली ॥’ (ज्ञानेश्वरी, अध्याय १६, ओवी ८३), म्हणजे ‘ज्याप्रमाणे कुलवान पुरुषाने आपली मुलगी चांगल्या कुळातच दिली’, असे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आपल्या मुलीला आपल्याच घरासारखे घर, आपल्याच माणसांसारखी माणसे इतरत्र कुठे मिळणार ?
१ उ. स्वभावधर्म : त्या घरातील व्यक्तींच्या स्वभावधर्माचा विचार ! राजा दशरथाने केकय राजाची कन्या कैकयी हिच्याशी लग्न केले. कैकयीच्या पित्याला पशू-पक्ष्यांची भाषा येत होती. एकदा पक्ष्यांचे संभाषण ऐकून त्याला हसू आले. तेव्हा त्याच्या पत्नीने हट्ट धरला की, पक्षी काय बोलले ?, ते मला सांगा. राजाने याविषयी आपल्या गुरूंना विचारले. त्यांनी सांगितले, ‘तू जर सांगितलेस, तर मरशील.’ राजाने ही गुरूंची आज्ञा असल्याचे सांगताच ती म्हणाली, ‘मेलात तरी चालेल; पण मला सांगा.’ असे जी म्हणाली, तिची मुलगी कैकयी ! दशरथाच्या मृत्यूला ती कारण झाली.
१ ऊ. गोत्रविचार : हिंदु विवाहशास्त्राप्रमाणे स्वजातीत विवाह करतांनाही गोत्रविचार महत्त्वाचा आहे. गोत्र म्हणजे वंश, सगोत्र म्हणजे एक वंश. सप्रवर म्हणजेही एक वंश. चुलत भावंडांचे लग्न अशास्त्रीय आहे, तसेच सगोत्र विवाह म्हणजेही ‘कझन मॅरेज’च (भाऊबंदकीमध्ये विवाह). जात एकच हवी. गोत्र भिन्न हवे. काही गोत्रांचे एकमेकांशी पटत नाही. दोन्ही गोत्रे मूळ एक वंश असल्याने त्यात लग्न होत नाही.
१ ए. पत्रिका विचार : गोत्र, घराणे, श्रीमंती, आचार-विचार सारे जुळल्यावर आणखी विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे पत्रिका ! ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने दोन्ही व्यक्तींच्या पत्रिका जुळतात कि नाही, हे पहाणे दोघांच्या हिताचे असते. धर्माच्या दृष्टीने पत्रिका पहाणे मुळीच आवश्यक नाही; पण पत्रिकेवरून जर भवितव्यातील धोके कळत असतील, तर ती पहाणे शहाणपणाचे नाही का ? (काही मंडळी ‘आमचा ज्योतिषावर विश्वास नाही’, असे म्हणतात. कुणी कशावर विश्वास ठेवावा, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे; पण आमच्या विश्वासाप्रमाणे विश्वव्यवस्थेत पालट होत नाही. आम्हाला काय वाटते, याच्याशी हे जग काही लागत नाही, एवढे तरी लक्षात घ्यावे.) (क्रमशः)
– भारताचार्य आणि धर्मभूषण प्रा. सुरेश गजानन शेवडे, चेंबूर, मुंबई.
(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)
यापुढील लेख आपण येथे वाचू शकता : https://sanatanprabhat.org/marathi/821791.html