पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !
५ ऑगस्ट या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘विवाह जुळवण्यापूर्वी पाहिली जाणारी काही तत्त्वे’ या अंतर्गत ‘दोन्ही घरांची आर्थिक स्थिती, कुळ, गोत्रविचार आणि पत्रिका विचार’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत. (लेखांक ३१)
यापूर्वीचा भाग वाचाण्याकरिता येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/821680.html
१. विवाह जुळवण्यापूर्वी पाहिली जाणारी काही तत्त्वे !
१ ऐ. अनुवंशिकतेचे महत्त्व : मनुष्य आकाशातून पडत नाही. तो आई-वडिलांच्या प्रत्यक्ष शरिरापासून जन्माला येतो. त्याचे प्रारब्ध पूर्वजन्माशी संबंधित असले, तरी त्याचे शरीर आणि मन हे पालकांच्या दोन शरिरांचे गुण घेऊनच उत्पन्न होतात. ‘‘There are no selfmade men. Each has within from his ancestary the potentiality of whatever he becomes. No amount of faithful plodding application can compensate for the lack of divine heredity at the start.’’ Genetics’, Vaulter. (कुणीही स्वप्रयत्नांनी मोठा होऊ शकत नाही. मनुष्याच्या कर्तृत्वात त्याच्या पूर्वजांपासून मिळालेल्या गुणांचाच भाग पुष्कळ मोठा असतो. आपल्या पूर्वजांच्या अनुवंशिक गुणांचा वारसा नसेल, तर कितीही कष्ट केले, तरी ते व्यर्थ होतात.)
गणितागत पद्धतीने केवळ शारीरिक किंवा बौद्धिक नव्हे, तर मानसिक, नैतिक गुणही अनुवंशिक असल्याचे सिद्ध झाले आहे.
२. सर्व पाहूनही लग्न अयशस्वी होते !
इतक्या सगळ्या गोष्टी पाहूनही काही वेळा लग्न अयशस्वी होतात म्हणे ! खरे तर तसे होऊ नये; पण गाडी व्यवस्थित आहे, पेट्रोल, हवा-पाणी, इंजिन-ऑईल सर्वकाही व्यवस्थित आहे. ब्रेक, ॲक्सिलरेटर, क्लच सर्व योग्य आहे. चालवणाराही उत्तम आहे; पण हे सगळे असूनही अपघात का होतात ? याचे उत्तर तो ‘अपघात’ असतो हेच !
३. भारतीय हिंदु समाजातच विवाहपरंपरा सहस्रो वर्षे टिकून आहेत !
सार्या जगात विवाहाला शास्त्र समजून विवाहपरंपरा सहस्रो वर्षे टिकवणारा केवळ भारतीय हिंदु समाज आहे. ‘Eat, drink and be merry’ (खा, प्या आणि विवाह करा), हे तत्त्वज्ञान भारतीय संस्कृतीचे नाही. ‘तू धर्माज्ञेप्रमाणे संतती उत्पन्न कर’, असे हिंदु धर्मशास्त्र सांगते. ‘पुत्रांश्चोत्पाद्य धर्मतः ।’ (मनुस्मृति, अध्याय ६, श्लोक ३६) म्हणजे ‘धर्माचरणाने संतती उत्पन्न करावी.’ स्त्रीविना पुरुष व्यर्थ आहे. स्मृतीकार म्हणतात,
एकचक्रो रथो यद्वद् एकपक्षो यथा खगः ।
अभार्याेऽपि नरस्तद्वदयोग्यः सर्वकर्मसु ।।
अर्थ : ज्याप्रमाणे एक चाकाचा रथ चालू शकत नाही, एका पंखाचा पक्षी उडू शकत नाही, त्याचप्रमाणे पत्नीविरहित पुरुष सर्व कार्यांत निरर्थक ठरतो.
यासाठी पुरुषाने विवाह केला पाहिजे. वर केलेल्या विवेचनाप्रमाणे उचित वधू निवडली पाहिजे. विवाह हा आमच्याकडे संस्कार आहे, ‘कॉन्ट्रॅक्ट’ (करार) नव्हे, ‘फ्रेंडशिप’ (मैत्री) नव्हे, केवळ ‘रजिस्ट्रेशन’ (नोंदणी) नव्हे, तर संस्कार; कारण ही संस्कृती आहे. हुल्लडबाजी नव्हे. येथे इतिहास आहे. गोंधळ नव्हे. या विवाहसंस्कारातील शेवटचा विषय आहे सप्तपदी ! हिंदु कायद्याप्रमाणे सप्तपदीविना धार्मिक विवाह पूर्ण होत नाही. या ७ पावलांत स्त्री पुरुषाकडून प्रतिज्ञा घेते आणि ७ पावले टाकते.
४. सप्तपदीत करावयाच्या प्रतिज्ञा !
तीर्थव्रतोद्यापनयज्ञदानं मया सह त्वं यदि कान्त कुर्याः ।
वामाङ्गमायामि तदा त्वदीयं जगाद वाक्यं प्रथमं कुमारी ।। १ ।।
अर्थ : कन्या पहिले वचन देतांना म्हणाली, ‘‘स्वामी, जर (तेव्हा) तुम्ही माझ्यासह तीर्थाटन, व्रत, उद्यापन, यज्ञ, दान आदी शुभ कर्म कराल, तेव्हा (तर) मी तुमच्या डाव्या अंगाला येईन (तुमची पत्नी होईन.)’’ (क्रमश:)
– भारताचार्य आणि धर्मभूषण पू. प्रा. सुरेश गजानन शेवडे, चेंबूर, मुंबई.
(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/822197.html