‘सकाळ माध्यम समुहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्याकडून ‘महाराष्ट्र अंनिस’ला १ कोटी रुपयांची देणगी !

पुणे – ‘सकाळ माध्यम समुहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ला १ कोटी रुपयांची वैयक्तिक देणगी दिली आहे. अंनिसचे राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. हमीद दाभोलकर यांनी ही देणगी स्वीकारली. ‘संस्थेचे आम्ही सर्व कार्यकर्ते विश्वासपूर्वक नमूद करतो की, दिलेल्या देणगीचा वापर सामाजिक जनजागृतीच्या उपक्रमांसाठी केला जाईल’, असे डॉ. हमीद यांनी या प्रसंगी सांगितले.

संपादकीय भूमिका :

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या ‘अंनिस’ अन् ‘परिवर्तन’ या दोन्ही न्यासांतील विविध घोटाळे पुढे आले असून त्यात विदेश निधी घोटाळा, न्यासाच्या स्थावर मालमत्तेचा घोटाळा, निधीचा अपव्यवहार घोटाळा यांसह अन्यांचा समावेश आहे ! यात प्रामुख्याने विदेशांतून पैसे घेण्याची अनुमती नसतांना पैसा जमा केला, तसेच ‘वैज्ञानिक जाणिवां’च्या नावाखाली शाळांतून अनधिकृतपणे पैसा गोळा केला आहे. विविध घोटाळ्यांच्या प्रकरणी साहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाने अंनिसच्या न्यासावर प्रशासक नेमण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे या पूर्वी महाराष्ट्र अंनिसला मिळालेल्या निधीचे काय केले ? हे घोषित केले पाहिजे ! तसेच सामाजिक जनजागृती उपक्रम म्हणजे मिळालेल्या निधीचा उपयोग हिंदु धर्म, देवता, संत यांच्यावर टीका करण्यासाठी वापरणार का ? तेही डॉ. हमीद यांनी स्पष्ट केले पाहिजे !