हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रायगड जिल्ह्यात ४ ठिकाणी गुरुपौर्णिमा साजरी !

रायगड – येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्ह्यात खोपोली, जांभूळपाडा, पेण आणि अलीबाग अशा ४ ठिकाणी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.

श्री. आकाश घरडे

१. खोपोली भागात झालेल्या गुरुपौर्णिमा सोहळ्यात ‘वेध सह्याद्री गड दुर्ग संवर्धन’चे संस्थापक श्री. आकाश घरडे उपस्थितांना मार्गदर्शन करतांना म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या हिंदूंचे आदर्श आहेत. त्यांनी उभारलेल्या गडदुर्गांचे संवर्धन करणेही आवश्यक आहे.’’ या वेळी त्यांनी खांदेरी गडाची झालेली दुरवस्था व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना दाखवली. जिल्ह्यातील सर्वच सोहळ्यांमध्ये ‘आनंदी जीवन आणि रामराज्याची स्थापना यासाठी साधना’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

या सोहळ्याला खोपोली नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसूरकर, माजी नगरसेवक दिलीप जाधव, उद्योजक बी. कल्याणजी, डॉ. नलिन शहा, दिनेश राठोड, नितीन चौगुले, संजय शिक्रे, प्रमोद अस्वले, प्रवचनकार ह.भ.प. अशोक पडवळ, ‘सहज सेवा फाउंडेश’नचे संस्थापक अध्यक्ष शेखर जांभळे उपस्थित होते.

२. पेण येथील गुरुपौर्णिमेत ह.भ.प. चंदन पाटील महाराज यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘जेव्हा एकमेकांच्या विचारांची शृंखला वाढते, तेव्हाच संघटन वाढते. आज आपण संघटित झालो नाही, तर उद्या अल्पसंख्यांक होऊ आणि नंतर आपला नाश झालेला असेल. सनातन धर्म हा आदि, अनंत आहे; पण श्रीकृष्ण प्रत्येक वेळी अवतार घेतो, भगवंताने अवतार घेतांना आपले त्या कार्यात कर्तव्य काय आहे, हे समजून घेऊन संघटित झाले पाहिजे.’’

श्री. सतीश खानेकर

३. जांभूळपाडा (पाली) येथील सोहळ्यात ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कारप्राप्त सतीश खानेकर यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले, ‘‘तन, मन, धन अर्पण केल्याविना साधकाची आध्यात्मिक प्रगती होत नाही. अहंभाव हा मनुष्याचा मोठा शत्रू आहे.  आपल्यातील अहंभाव घालवण्याचे आणि जीवनातील आनंद कसा शोधावा, याचे मार्गदर्शन गुरु करतात. भगवंताच्या चरणी लीन होणे, हाच खरा परमानंद !’’ ‘धर्मरक्षणाचे महान कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे’, असेही ते म्हणाले. या वेळी माजी सरपंच सौ. श्रद्धा कानडे, माजी सभापती सौ. भारती शेळके आणि तीन ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

४. रामनाथ (अलीबाग) येथील गुरुपौर्णिमेला हिंदु जनजागृती समितीच्या सौ. विशाखा आठवले यांनी मार्गदर्शन केले.