Anti-Reservation Protest In  Bangladesh : आंदोलकांनी बांगलादेशच्या सरकारी वृत्तवाहिनीचे मुख्यालय पेटवले !

  • आरक्षणविरोधी आंदोलनाची धग कायम !

  • आतापर्यंत ३२ जण ठार !

  • संपर्कयंत्रणा कोलमडली !

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात सरकारी नोकर्‍यांमध्ये देण्यात आलेल्या आरक्षणाच्या विरोधातील आंदोलनाने आता उग्र रूप धारण केले आहे. १८ जुलैच्या सायंकाळी आंदोलकांनी बांगलादेशाची मुख्य सरकारी वृत्तवाहिनी ‘बीटीव्ही’च्या मुख्यालयालाच आग लावली. याचे कारण असे सांगण्यात येत आहे की, १८ जुलैच्या सकाळीच पंतप्रधान शेख हसीना यांनी तेथे येऊन मुलाखत दिली होती. आंदोलनांतर्गत घडलेल्या विविध घटनांत आतापर्यंत किमान ३२ लोक मारले गेले आहेत.

१. ‘बीटीव्ही’च्या मुख्यालयातील एका कर्मचार्‍याने सांगितले की, शेकडो आंदोलक अचानक मुख्यालयाच्या परिसरात घुसले आणि त्यांनी ६० हून अधिक वाहनांना आग लावली.

२. बांगलादेशमध्ये ठिकाठिकाणी विद्यार्थी आणि पोलीस यांच्यात हिंसक चकमक चालूच आहे.

३. आंदोलनामुळे झालेल्या हिंसाचारात केवळ १९ जुलैलाच किमान २५ जणांचा मृत्यू झाला आहे. याखेरीज १ सहस्राहून अधिक लोक घायाळ झाले आहेत.

४. देशातील ६४ पैकी ४७ जिल्ह्यांत हिंसाचार चालू असून आतापर्यंत किमान १ सहस्र ५०० लोक घायाळ झाले आहेत, तसेच १०० पोलीसही घायाळ झाल्याचे वृत्त आहे.

५. अशातच देशभरातील सपंर्क यंत्रणेतही बिघाड झाल्याचे समजते. देशात अनेक ठिकाणी भ्रमणभाष संपर्कयंत्रणा कोलमडली.

६. आरक्षणविरोधी आंदोलनामागे महागाई, वाढती बेरोजगारी, तसेच घटत्या विदेशी ठेवी कारणीभूत असल्याचे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे.