पूजा खेडकर यांनी पुण्यात येऊन जबाब नोंदवण्यासाठी पुणे पोलिसांचे समन्स !

पुणे जिल्हाधिकार्‍यांनी छळ केल्याचा पूजा यांचा आरोप !

वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर

पुणे – वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांनी पुण्यात येऊन पोलिसांसमोर जबाब नोंदवावा, असे समन्स पुणे पोलिसांनी खेडकर यांना बजावले आहे. प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांनी ‘पुण्याच्या जिल्हाधिकार्‍यांनी माझा छळ केला’, अशी तक्रार वाशिम पोलिसांकडे केली होती. ही घटना पुण्यातील असल्याने वाशिम पोलिसांनी पुढील चौकशीसाठी हे प्रकरण पुणे पोलिसांकडे वर्ग केले आहे.

विविध विभागांकडून चौकशी

प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबियांची राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध विभागांकडून चौकशी चालू करण्यात आली आहे. त्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, समाजकल्याण, प्राप्तीकर विभाग, अतिक्रमण अशा विविध विभागांनी चौकशीला प्रारंभ केल्याचे समजते. पूजा खेडकर यांनी परीक्षेसाठी दिलेल्या विविध कागदपत्रांचीही चौकशी करण्यात येत आहे.

मनोरमा खेडकर यांना अटक !

मुळशी तालुक्यातील एका शेतकर्‍याला पिस्तूल दाखवून धमकावल्याच्या प्रकरणी मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता. तेव्हापासून त्या पसार झाल्या होत्या. त्यांच्या अटकेसाठी ग्रामीण पोलिसांची ३ पथके कार्यरत होती. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील हिरकणवाडीतील ‘पर्वती लॉज’मधून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर मात्र अद्यापही पसार झालेले आहेत.