विठ्ठलाच्या दर्शनासाठी दर्शन मंडप आणि टोकन दर्शन पद्धत राबवण्यासाठी १०३ कोटी रुपयांचा निधी संमत
पंढरपूर (जिल्हा सोलापूर), १७ जुलै (वार्ता.) – आषाढी एकादशीनिमित्त येथील वातावरण भक्तीमय झाले होते. ‘विठ्ठला, माझ्या बळीराजाला सुखी ठेव, कष्टकर्यांच्या आणि सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे, प्रत्येकाचे दुःख दूर कर’, असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सपत्नीक केली. या वेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की,
१. शासनाने वारकरी महामंडळाची स्थापना केली असून वारीतील दिंड्यांना अनुदान देण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाला आषाढी वारीनिमित्त देण्यात येणार्या निधीमध्ये तिपटीने वाढ केली आहे. सर्वांच्या संमतीने ‘पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा’ केला जाणार आहे.
२. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनासाठी ७३ कोटी ८० लाख रुपयांचा निधी संमत केला आहे. या अंतर्गत असलेली सर्व कामे उत्कृष्ट असून मंदिराला पूर्वीचे वैभव प्राप्त होत आहे. तिरुपती बालाजी मंदिरातील पद्धतीप्रमाणे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शन मंडप आणि टोकन दर्शन पद्धत राबवण्यासाठी जिल्हा प्रशासन अन् मंदिर समिती यांनी सिद्ध केलेल्या १०३ कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळी केली.