‘वैष्णव भक्ती’ची वारी ‘सेक्युलर’ (निधर्मी) करण्याविषयीचे जिहादी, साम्यवादी, लिबरल (उदारवादी) आणि पुरोगामी कंपू यांचे षड्यंत्र ओळखा !

पंढरपूरची वारी आणि आषाढी एकादशीचे व्रत महाराष्ट्रातील सामाजिक समरसतेचा सर्वांत मोठा सण उत्सव असून ‘वेदशास्त्र माहेर विठ्ठल’ हे सर्वसामान्य माणसाचे दैवत आहे. त्यामुळे आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर वारीमध्ये वैष्णवांचा मोठा जनसागर आपल्या दैवताचे रूप पहाण्यासाठी उपस्थित होतो. हिंदुत्वाच्या एकतेचे विशाल स्वरूप असलेल्या वारीमधील समरसता, बंधुभाव काही समाजविघातक टोळ्या आणि संघटना, संस्था यांच्या डोळ्यांत सतत खुपत आहे. त्यामुळे त्यांनी पंढरपूरच्या वारीमध्ये प्रवेश करून वारकरी बंधूची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालवला आहे, तसेच हा कणा मोडण्यासाठी त्यांनी माध्यमांद्वारे काही छुपे प्रयोग करणेसुद्धा चालू केले. स्वतःला नास्तिक म्हणणार्‍या टोळ्या मुळातच सहिष्णू असलेल्या ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद- भ्रम अमंगळ ।।’ ही समरसता आणि बंधुभाव जगणार्‍या वारीला ‘छद्म सर्वधर्मसमभावा’ची वारी करण्यासाठी आटापिटा करत आहेत.

 वारकरी

१. वारीला समाजविघातक मंडळींकडून घेरण्याचा प्रयत्न

आषाढी एकादशीसाठी महाराष्ट्राच्या गावागावांमधून पालख्या, शेकडो दिंड्या आणि लाखो वारकरी पंढरपूर दिशेने पायी निघत असतात. अशा दिंड्यांमध्ये नास्तिक मंडळींनी खोटे वारकरी बनून वावरणे चालू झाले आहे. ही मंडळी आपण वारकरी असल्याचा बनाव करत आहेत, तसेच काही हिंदुविरोधी साम्यवादी पत्रकारही घुसले आहेत आणि ते वारीमधील चुकीचे वार्तांकन करून संभ्रम निर्माण करत आहेत. काही राजकीय पक्षांचे नेतेही वारीमध्ये सामील होऊन राजकारण करत असल्याचे दिसत आहे. खरे म्हणजे वारीत कुणीही येऊ शकतो. वारी ही सर्वांची आहे. श्री विठ्ठलही सर्व वैष्णवांचा आहे. त्यामुळे वारी आणि विठ्ठल यांवर कुणाचीही मक्तेदारी नाही, हे सत्य आहे; पण वारीमध्ये सामील होण्याचा हेतू शुद्ध असला पाहिजे. जगद्गुरु संत तुकोबांनी ‘शुद्ध बीजा पोटी, फळे रसाळ गोमटी’, म्हटले आहेच. संत तुकोबांनी ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म’, हा विचार मांडलेल्या वारीत ‘श्रमिक मुक्ती आंदोलना’चे भारत पाटणकर (दिवंगत गेल ओम्हवेट यांचे पती) हे ‘विठ्ठल हे विष्णूचे अवतार नाहीत’, असे खोटे सांगून सतत वाद निर्माण करतात, तसेच ख्रिस्ती मिशनरी पत्रके, बायबलच्या प्रती वाटप करण्याचे काम पद्धतशीर करत आहेत. एकूणच काय, तर वारीला समाजविघातक मंडळींनी चारही बाजूंनी घेरल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

२. वारीत राजकारण आणून वारकर्‍यांचा जाणीवपूर्वक अवमान करण्याचा प्रयत्न

पंढरपूर वारीत पूर्वी मंत्री बबनराव पाचपुते एक वारकरी म्हणून सामील व्हायचे. त्यांनी कधी वारीमध्ये राजकारण केल्याची किंवा वारकरी संप्रदायमध्ये संभ्रम निर्माण करण्याची नोंद नाही; परंतु आताच्या वारीमधील चित्र आश्चर्यकारक आहे; कारण काही वर्षांपूर्वी हिंदु देवीदेवता, सण, उत्सव, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीची टिंगलटवाळी करणार्‍या सुषमा अंधारे यांनी वारीत प्रवेश केला, फुगडी खेळली, ‘शेख महंमद विठ्ठल’ नावाचा गजर केला, तसेच शरद पवार यांचे काही समर्थकसुद्धा वारीत घुसले आहेत. त्यांनी तर शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांची विठ्ठल-रखुमाईशी तुलना केली आहे. अवघ्या आयुष्यात ज्या व्यक्तीला वारी, वारकरी, श्री विठ्ठल आठवला नाही, जे स्वत:ला नास्तिक म्हणवतात, त्यांना विठ्ठल रखुमाईची उपमा ? हा तर जाणीवपूर्वक वारकर्‍यांचा केलेला अवमान आहे.

ज्यांनी आयुष्यभर स्वतःला नास्तिक असण्याचा टेंभा मिरवून सतत मुसलमानांचा अनुनय आणि लांगूलचालन केले, सत्यनारायण पूजेला विरोध आणि ‘इफ्तार’ मेजवानीमध्ये शिरखुर्मावर ताव मारला, ‘देवाची पूजा घरात आणि नमाज रस्त्यावर’, अशा दुटप्पी विचारांचे समर्थन करणार्‍यांची तुलना विठ्ठलाशी करतांना लाज कशी वाटत नाही ? जो राजकीय नेता हिंदूंना सरळ सरळ हिंसक म्हणतो, त्या काँग्रेसच्या राजकुमार राहुल गांधींना वारीमध्ये येण्याचे आमंत्रण दिले जात आहे. नवरात्र उत्सवात भगवतीची आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची टिंगलटवाळी करणार्‍या सुषमा अंधारे यांचे वारीत काय काम आहे ? त्यामुळे अशा दुटप्पी आणि बेगड्या नास्तिक मंडळींच्या वारीमधील उपस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून ‘त्यांचे वारीमध्ये काय काम आहे ?’, असा प्रश्न सामान्य वारकरी उपस्थित करत आहेत. आज वारकरी संप्रदायांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर विचार करण्याची आवश्यकता आहे.

३. दिंडीवर दगडफेक करणार्‍या जिहाद्यांचा माध्यमे कधी निषेध करतात का ?

या सर्वांच्या जोडीला मुसलमानांमधील काही घटकांकडून वारीत ‘सेक्युलॅरिजम’चा (निधर्मीवादाचा) प्रचार चालू आहे. वारीतील लोकांना सेवा देणे, पाणी वाटप करणे, शिरखुर्मा देणे असे प्रकार चालू आहेत. प्रसारमाध्यमांकडून याला ‘हिंदु-मुसलमान एकते’च्या नावाखाली प्रसिद्धीही दिली जात आहे. वारीत गावोगावी सहस्रो लोक सेवा करतात, अन्नदान करतात, वारकरी बांधवांची सोय करतात, आरोग्य शिबिरे घेतात; त्यांना माध्यमे कधीच प्रसिद्धी देत नाहीत; परंतु २-४ मुसलमानांनी पाणी वाटप केले की, लगेच त्याची प्रसिद्धी होते. ज्यांना वारीतील हिंदु बांधवांविषयी इतके प्रेम आहे, ते दिंडीवर दगडफेक करणार्‍या जिहाद्यांचा निषेध करतात का ? एकीकडे पाणी वाटप आणि दुसरीकडे दगडफेक करायची, हे योग्य आहे का ? वारकर्‍यांना मशिदीसमोरून जातांना भजन म्हणू दिले जात नाही. एकीकडे ‘शेख महंमद विठ्ठला’ म्हणायचे आणि त्याच शेख महंमदांनी केलेल्या पशूबळीच्या विरोधाला मात्र सोयीस्कर विसरायचे ?

४. वैष्णव भक्तीची वारी ‘सेक्युलर’  (निधर्मी) होऊ द्यायची का ?

जिहादी, साम्यवादी, लिबरल (उदारवादी) आणि पुरोगामी कंपू यांचे हे ढोंग ओळखले पाहिजे, नाही तर शेकडो वर्षांची वारीची परंपरा हे लोक गढूळ केल्याविना रहाणार नाहीत. सर्व समाज समरस करण्यासाठी चालू झालेली वैष्णव भक्तीची वारी ‘सेक्युलर’ होऊ द्यायची का ? याचा प्रत्येक मराठी माणसाने विचार करण्याची आवश्यकता आहे.

– श्री. अशोक राणे, विश्व संवाद केंद्र, देवगिरी प्रांत.

(साभार : फेसबुक)

संपादकीय भूमिका

साम्यवादी, जिहादी आणि नास्तिक यांचे वारी ‘निधर्मी’ करण्याचे षड्यंत्र वैष्णवजनांनी हाणून पाडावे !