विठुमाऊली जगाची !

विठुमाऊली

आषाढी एकादशीनिमित्त निघालेल्या वारीच्या माध्यमातून सर्वत्र वातावरण विठ्ठलमय होते. संपूर्ण वातावरणात चैतन्य पसरते. तहान-भूक विसरून सर्व वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने पायी मार्गस्थ होतात.

प्रत्येक वारकर्‍याला ‘मी या वारीत कसा सहभागी होऊ शकतो ?’, याची तळमळ असते. प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या प्रकारे यात सहभागी होण्याचा प्रयत्न करतो. कधी थोडे अंतर वाहनाने, तर कधी पायी. काही जण वारकर्‍यांच्या पायाला तेल लावून मर्दन करणे, पादत्राणे उपलब्ध करून देणे अशा सेवा करतात. काही जण वारकर्‍यांसाठी गोळ्या, औषधे उपलब्ध करून देतात. ‘वारकर्‍यांची सेवा ही विठुरायाचीच सेवा’, असे ते मानतात. वारीला सहस्रो वर्षांची परंपरा आहे. वारकरी एकमेकांना भेटल्यावर ‘माऊली’ असे संबोधून एकमेकांना पदस्पर्श करतात. वारकर्‍यांमध्ये प्रत्येक जिवात देवाला पहायला शिकवले जाते आणि तोच भाव अनेकांपर्यंत पोचतो. त्यामुळेच विठुरायाची ही समष्टी सेवा केली जाते. वारीला जाणार्‍या वारकर्‍यांमध्ये अनेकांना विठुमाऊलीला अनुभवण्याचीच संधी मिळते !

सर्वांना वारीला जाणे शक्य होतेच, असे नाही; पण ‘मनामधून विठुरायाला अनुभवणे’, हे प्रत्येकाला शक्य आहे; कारण ‘जिथे भाव तिथे देव’ असतो. म्हणून ज्या भावाने तुम्ही देवाला पहाल, त्या भावाने देव तुम्हाला दिसणार आहे. जेव्हा मनाला प्रश्न पडतो, ‘पांडुरंगा, तू आहेस तरी कुठे ?’ तेव्हा देवाला संपूर्णपणे शरण गेल्यावर त्याचे उत्तर मिळते. वारकर्‍यांच्या खांद्यावरील त्या भगव्या पताकांमध्ये, डोईवर घेतलेल्या तुळशीमध्ये, कष्ट सोसूनही वारकर्‍यांच्या त्या हसर्‍या चेहर्‍यामध्ये, कर्तव्य निभावणार्‍या शासकीय यंत्रणांमध्ये, वारीत चालणार्‍या मुक्या प्राण्यांमध्ये…सर्वत्र पांडुरंगाचे दर्शन व्हायला लागते आणि मनाला पडलेल्या कोड्याचे उत्तर मिळते !

वय, भाषा, प्रांत, वर्ण, जात ही सर्व बंधने झुगारून वारकरी एकत्र येतात आणि भक्तीरसात नाचू-गाऊ लागतात, तेव्हा ‘अवघा रंग एकचि झाला’, असे वातावरण निर्माण होते. सहस्रो मीटर पायी प्रवास करत आलेला संत-भक्तांचा मेळा जमतो. भक्ताप्रमाणेच देवालाही त्याच्या भक्तांना भेटण्याची आस लागलेली असते. म्हणूनच ‘ठेवून कर कटीवर विठ्ठल उभा विटेवर’, असा युगायुगांपासून विठुराया आपल्या भक्तांसाठी विटेवर उभा आहे. तोही सर्व बंधने झुगारून त्याच्या भक्तांना प्रेमाने जवळ घेऊन त्यांचा लडीवाळ करतो. संत जनाबाईंनी म्हटल्याप्रमाणे ‘गोपाळा करी भक्तांचा सोहळा । विठु माझा लेकुरवाळा । संगे गोपाळांचा मेळा ।।’ कुटुंबातील माऊलीप्रमाणेच विठुराया भक्तांचे पालनपोषण करतो, अनेक अपराध क्षमा करून सुधारण्याची संधी देतो, कडेवर घेऊन लाड करतो. अशा या विठुमाऊलीला शरणागतभावाने नमस्कार !

जय हरि !

– श्री. जयेश बोरसे, पुणे