कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचा जामीन रहित !

कोल्हापूर – कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील एक संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचा जामीन जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस्.एस्. तांबे यांनी १६ जुलै या दिवशी रहित केला. सरकारी पक्षाच्या वतीने डॉ. तावडे यांचा जामीन रहित होण्यासाठी आवेदन सादर करण्यात आले होते. त्यावर दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण झाल्यावर न्यायाधिशांनी १६ जुलैला त्यांचा निर्णय घोषित केला. यानंतर डॉ. तावडे यांच्या वतीने अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी ‘डॉ. तावडे यांना परत कारागृहात जाण्याच्या अगोदर १० दिवसांची मुदत मिळावी’, असे आवेदन केले होते. हे आवेदन न्यायालयाने फेटाळले. त्यामुळे आतंकवादविरोधी पथकाने डॉ. तावडे यांना कह्यात घेऊन त्यांची पुढील रवानगी कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात केली. ‘या प्रकरणी लवकरच आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका (अपील) करू’, असे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी पत्रकारांना सांगितले.

१. डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना वर्ष २०१८ मध्ये कोल्हापूर येथील न्यायालयाने जामीन संमत केला होता. जामीन संमत झाला, तरी ते डॉ. दाभोळकर हत्या प्रकरणात जामीन न मिळाल्याने पुणे येथील कारागृहात होते.

२. डॉ. तावडे यांची डॉ. दाभोलकर प्रकरणात १० मे २०२४ या दिवशी निर्दाेष मुक्तता झाल्यावर ते कारागृहाबाहेर आले होते. आता कॉ. पानसरे प्रकरणी त्यांचा जामीन रहित झाल्याने त्यांना परत कारागृहात जावे लागले आहे.

३. या प्रकरणातील अन्य संशयित अमित डेगवेकर, गणेश मिस्कीन, वासुदेव सूर्यवंशी आणि अमित बद्दी यांना जामीन संमत करण्यात यावा, यासाठी आवेदन प्रविष्ट (दाखल) करण्यात आले आहे. त्यावरही दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे.

४. ‘या प्रकरणाचा निकाल अन्य न्यायालयीन कामकाजामुळे पुढे ढकलण्यात यावा’, अशी मागणी संशयितांच्या वतीने अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी न्यायालयात केली. न्यायालयाने ती मान्य केली. त्यामुळे या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १ ऑगस्ट या दिवशी होणार आहे. सरकारी पक्षाच्या वतीने अधिवक्ता शिवाजीराव राणे यांनी काम पाहिले.