‘मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यासाठी आलो होतो. आश्रम पहात असतांना मला प्रत्येक ठिकाणी सूक्ष्मातून गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) दर्शन होत होते. तेव्हा मला पुष्कळ चैतन्य अनुभवायला मिळत होते. गुरुदेव नेहमी सूक्ष्मातून माझ्या समवेतच असतात. त्या दिवशी मी त्यांच्या चरणांजवळ आल्याची मला अनुभूती येत होती.
त्या वेळी माझी गुरुदेवांना आर्ततेने प्रार्थना झाली, ‘हे गुरुदेवा, तुमच्या चरणांवर लीन होण्यातील माझ्यात असलेले स्वभावदोष आणि अहं यांचे अडथळे तुम्हीच दूर करा. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यासाठी आश्रमात येण्याचा माझा उद्देश सफल करा. तुम्ही माझ्या समवेत सतत असता. तुम्हीच मला ही प्रक्रिया शिकवा.’ नंतर मला प्रसन्न आणि शांत वाटू लागले. मला हलकेपणा जाणवू लागला. तेव्हा ‘गुरुदेव सर्वकाही करून घेतील’, याची मला निश्चिती झाली.
१. ‘अपेक्षा करणे’, ‘इतरांना समजून न घेणे’ आणि ‘स्वतःला समजून घ्यावे’, असे वाटणे’, या स्वभावदोष अन् अहंच्या पैलूंवर गुरुदेवांच्या कृपेने मात करता येणे
एकदा माझ्याकडे भांडी लावण्याची सेवा होती. मी सर्व भांडी पुसून ‘क्रेट’मध्ये वर्गवारी करून ठेवली होती. एका ताईंना चहाची पातेली, गाळणी आणि चिमटा हवा होता. तेव्हा त्यांनी भांडी एकेक करून एकत्र ठेवली. त्यामुळे मी ३० मिनिटांपासून करत असलेली सेवा मला पुन्हा करावी केली. तेव्हा त्या प्रसंगात ‘गुरुदेवांना मला काय शिकवायचे आहे ?’, हे माझ्या लक्षात आले. ‘त्या प्रसंगात मला शांत आणि स्थिर रहाता येते का ?’, हे तपासण्यासाठी गुरुदेवांनी तो प्रसंग घडवला’, असे मला वाटले. तो प्रसंग घडवून गुरुदेवांनी माझ्यावर कृपा केली. त्यांनी तसे केले नसते, तर माझ्या लक्षात आले नसते की, ‘प्रत्येक प्रसंगात स्थिर राहिल्यामुळे अंतर्मुखता वाढते आणि स्वतःत कृतज्ञताभाव निर्माण होतो.’
दुसर्या एका प्रसंगात आम्ही चार साधक कोबी चिरत होतो. त्या वेळी एक काका माझ्याशी प्रतिक्रियात्मक बोलले. तेव्हा ‘काका माझ्याशी असे का बोलले ?’, असे सहसाधकांना वाटले. ‘देवाने तो प्रसंग मला शिकवण्यासाठी घडवला’, असा माझा विचार होऊन मला त्या प्रसंगात आनंदी रहाता आले. मला सहसाधकांनी विचारले, ‘‘दादा, तुम्हाला वाईट वाटले का ?’’ मी त्यांना सांगितले, ‘‘ते काका ज्येष्ठ आहेत. ते मला रागावू शकतात.’’ त्या दिवशी ते काका माझ्याशी बोलले नाहीत. मी दुसर्या दिवशी त्यांच्याकडे स्वतःहून जाऊन त्यांना नमस्कार केला आणि त्यांच्याशी प्रेमाने बोललो. गुरुदेवांनी मला प्रत्येक साधकाकडे कृतज्ञताभावाने पहायला शिकवले. त्यामुळे मला प्रत्येक प्रसंगात आनंद घेता आला. मला त्या काकांबद्दल कृतज्ञता वाटली आणि माझ्या मनात गुरुदेवांच्या प्रती भाव जागृत झाला. ‘गुरुदेव मला या सेवेच्या माध्यमातून ‘प्रसंगाला सामोरे कसे जायचे ?’, हे शिकवतात’, त्याबद्दल गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !
२. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवत असतांना गुरुदेवांना सतत प्रार्थना करणे आणि गुरुदेवांनी सूक्ष्मातून ‘साधकांवर निरपेक्ष प्रेम करायला शिक’, असे सांगणे
अन्य वेळी सहसाधकांना सतर्कतेने साहाय्य करायला मी न्यून पडत होतो. मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवत असतांना गुरुदेवांना सतत माझी प्रार्थना होत होती, ‘गुरुदेव, मी असे काय करू की, जेणेकरून तुम्हाला चांगले वाटेल.’ तेव्हा गुरुदेवांनी सूक्ष्मातून मला सुचवले, ‘साधकांवर निरपेक्ष प्रेम करायला शिक.’ त्या दृष्टीने मी प्रयत्न चालू केले.
२ अ. देवाने करून घेतलेले प्रयत्न
अ. आश्रमातून निवासस्थानी जातांना चारचाकी गाडीत स्वतः आसंदीवर न बसता अन्य साधकांना आसंदीवर बसायला सांगणे.
आ. काही साधिकांच्या हातात मोठी ‘बॅग’ असायची, ती स्वतःकडे घेऊन त्यांना साहाय्य करणे.
इ. एक काका रुग्णाईत होते. त्यांच्या खोलीतील केर काढणे.
ई. एका काकांना चालतांना त्रास होत असे. त्या वेळी त्यांचे जेवणाचे ताट धुणे.
उ. साधक भाजी निवडत असतांना त्यांच्यासाठी पंखा लावणे, त्यांना सेवेसाठी वस्तू आणून देऊन साहाय्य करणे.
गुरुदेवांनी माझ्याकडून या सेवा माझ्यात सतर्कता वाढवण्यासाठी करून घेतल्या. मी अन्य साधकांमधील गुणांकडे पाहून शिकत होतो.
३. ‘काटकसरीपणा आणि आज्ञापालन करणे’ हे गुण आचरणात आणल्यावर आनंद मिळतो’, हे लक्षात येणे
एकदा मी कोथिंबीर निवडत होतो. एरव्ही माझ्याकडून त्यातील बराचसा भाग टाकून दिला जात असे. आश्रमात कोथिंबीर निवडतांना पिवळी झालेली पाने, वाळलेली पाने, हिरवी पाने, कोवळे देठ अशी वर्गवारी करून कोथिंबीर निवडतात. तेव्हा ‘देव किती शिकवत आहे !’, असे वाटून माझा कृतज्ञताभाव जागृत होत असे. मी आश्रमात असतांना भांडी धुतांना आवश्यक तेवढेच पाणी आणि साबण वापरण्याची शिकवण मला मिळाली. मी निवासस्थानी असतांना सकाळी उठून बाहेरचे सर्व दिवे बंद करत असे. मी खोलीतील पंखा आवश्यक तेवढाच चालू करत होतो. गुरुदेवांनी मला ‘काटकसरीपणा’ हा गुण शिकवला. उत्तरदायी साधिका माझ्या सेवेत पालट करत होत्या. तेव्हा मी त्यांनी सांगितलेले ऐकत असे. मला एखादे सूत्र ठाऊक असले, तरीही मी उत्तरदायी साधकांना विचारत असे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे करत असे. त्यांचे आज्ञापालन केल्याने मला पुष्कळ आनंद मिळत होता.
४. ‘गुरुदेव साधकांच्या मनातील जाणतात’, याची आलेली प्रचीती
एकदा मी भाजी चिरत असतांना सुरी माझ्या तळहाताला लागून मला लहानशी जखम झाली. मी मलमपट्टी करून घेतली. त्यानंतर काही वेळाने एका साधिकेने विचारले, ‘‘काका, तुम्ही भांडी घासू शकाल का ?’’ (त्या साधिकेला ‘माझ्या हाताला लागले आहे’, हे ठाऊक नव्हते.) तेव्हा मला वाटले, ‘गुरूंच्या सेवेला ‘नाही’ कसे म्हणायचे ?’ मी लगेच ‘हो’ म्हटले. मी भांडी घासू लागलो. एका काकूंनी लोखंडी कढई घासण्यासाठी ठेवली. तेव्हा मला प्रश्न पडला, ‘अन्य भांडी ठीक आहेत; पण जखमेला लोखंडी भांड्याचा गंज लागला, तर काय होईल ?’ तेवढ्यात एका दादांनी मला सांगितले, ‘‘मी तुम्हाला साहाय्य करायला आलो आहे.’’ आश्चर्य म्हणजे त्यांना ‘मला लागले आहे’, हे ठाऊक नव्हते. त्यांनी लगेच लोखंडी कढई घासायला घेतली. मला गुरुदेवांमधील देवत्वाची अनुभूती आली. माझ्या लक्षात आले, ‘गुरुदेव आपल्या मनातील प्रत्येक विचार जाणतात.’
५. स्वतःकडून चूक झाली नसतांनाही ती मान्य केल्यामुळे एक वेगळाच आनंद मिळणे
एकदा आम्ही (मी, दोन साधिका आणि दोन साधक) कोबी चिरत होतो. तेव्हा सहसाधकाने कोबीचा टाकून द्यायचा भाग चांगल्या भागात नकळत ठेवला. त्या वेळी माझ्या शेजारी बसलेल्या काकूंनी मला सांगितले, ‘‘दादा, नीट पाहून सेवा करा.’’ त्या काकूंना ठाऊक नव्हते की, ‘तसे मी केले नसून अन्य साधकाने केले आहे.’ मीही त्यांना सांगितले नाही की, ‘मी ते टाकले नाही.’ मी त्यांना सांगितले, ‘‘हो काकू, चुकले. क्षमा करा. पुढच्या वेळी काळजी घेतो.’’ तेव्हा ‘त्या साधकाची चूक ही माझीच चूक आहे’, असे मी स्वीकारल्यामुळे मला पुष्कळ आनंद झाला. देवाने याही प्रसंगात मला साहाय्य केले. नंतर काही वेळाने पू. रेखा काणकोणकर (सनातनच्या ६० व्या संत, वय ४६ वर्षे) यांनी आधी मला प्रसाद दिला आणि नंतर इतरांना दिला. तेव्हा मला वाटले, ‘या प्रसंगात मला स्वीकारता आले; म्हणून गुरुदेवांनी मला खाऊ दिला.’ माझी चूक नसतांनाही ती मला स्वीकारता आली; म्हणून माझा कृतज्ञताभाव जागृत होत होता. माझी अंतर्मुखता वाढली अन् सहसाधकाच्या प्रती प्रेमभाव जागृत झाला.
‘गुरुकृपेमुळे मला ही सूत्रे लक्षात आली’, त्याबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव, सद्गुरु आणि संत यांच्या पावन चरणी चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. वसंत पाटील, जळगाव (२.५.२०२३)