विशाळगडावरील अतिक्रमणाच्या प्रकरणी छत्रपती संभाजीराजे यांनी हिंदु समाजाची दिशाभूल करू नये ! – कुंदन पाटील, सकल हिंदु समाज

‘खासदारकीच्या ६ वर्षांच्या कालावधीत संभाजीराजे अतिक्रमणाविषयी गप्प का होते ?’, असाही प्रश्‍न हिंदुत्वनिष्ठांनी केला उपस्थित !

पत्रकार परिषदेत उपस्थित डावीकडून श्री. अभिजित पाटील, श्री. निरंजन शिंदे, श्री. मनोहर सोरप, श्री. उदय भोसले, श्री. कुंदन पाटील, श्री. गजानन तोडकर, श्री. संदीप सासणे आणि श्री. सुनील सामंत

कोल्हापूर – छत्रपती संभाजीराजे हे ६ वर्षे राष्ट्रपती नियुक्त खासदार होते, तेव्हा त्यांनी विशाळगडावरील अतिक्रमणांविषयी कधीही आवाज उठवला नाही. ते रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष होते, तेव्हाही या अतिक्रमणांविषयी त्यांनी कधी आवाज उठवला नाही. ७ जुलैला जेव्हा सकल हिंदु समाजाच्या वतीने विशाळगड येथे महाआरती करण्यात आली, तेव्हाही छत्रपती संभाजीराजे त्यात सहभागी झाले नाहीत. १४ जुलैला आता ते स्वतंत्र आंदोलन का करत आहेत ? हा प्रश्‍न सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित असतांना विशाळगड अतिक्रमणावरून छत्रपती संभाजीराजे यांनी हिंदु समाजाची दिशाभूल करू नये, असे प्रतिपादन विश्‍व हिंदु परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील यांनी केले. ते सकल हिंदु समाजाच्या वतीने हिंदु एकता कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

या प्रसंगी हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, अखिल भारत हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप सासणे, ‘महाराज प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष श्री. निरंजन शिंदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. अनिरुद्ध कोल्हापुरे, ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोल्हापूर शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, सर्वश्री प्रमोद सावंत, अभिजित पाटील, राजू तोरस्कर, योगेश केरकर, सोहम कुराडे, सनी पेणकर, आनंद कवडे, विकी भोगम, केदार मुनीश्‍वर आणि ऐश्‍वर्या मुनीश्‍वर उपस्थित होते.

श्री. कुंदन पाटील पुढे म्हणाले, ‘‘हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी विशाळगडाच्या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांकडे दिलेल्या निवेदनानंतर प्रथम १३ सप्टेंबर २०१९ या दिवशी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांसह अन्य सर्व संबंधित अधिकार्‍यांची बैठक होऊन येथील अतिक्रमण काढण्याविषयी चर्चा झाली. यानंतर वर्ष २०२२ मध्ये वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्या समवेत मी आणि श्री. विक्रम पावसकर यांची सह्याद्री अतिथीगृहावर विशाळगडवरील अतिक्रमण हटवण्याच्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक संभाजीराजे यांनी होऊ दिली नाही आणि कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली. यानंतर गेली २ वर्षे संभाजीराजे यांनी काय केले ?

७ जुलैला विशाळगडावर सकल हिंदु समाजाची महाआरती झाली असतांना परत एकदा १४ जुलैला हिंदु समाजाला विशाळगडावर बोलावून संभाजीराजे हिंदु समाजात दुफळी माजवत आहेत का ? या संदर्भात प्रत्यक्षात जर काही करायचे असेल, तर ते याविषयी उच्च न्यायालयात चांगला अधिवक्ता का नियुक्त करत नाहीत ? जेव्हा अधिकार होते, तेव्हा काहीच करायचे नाही आणि आता विशाळगडावर जाण्यासाठी आवाहन करायचे, हा नेमका काय प्रकार आहे ? यातून गडावर कोणता अनुचित प्रकार घडल्यास त्याला उत्तरदायी कोण ? त्यामुळे हिंदु समाजानेही कोणत्याही प्रकारे आततायीपणे कृती न करता शांतपणे या लढ्यात सकल हिंदु समाजाच्या समवेत उभे रहावे.

अतिक्रमणाला उत्तरदायी असलेल्या सर्वच अधिकार्‍यांवर कारवाई अपेक्षित !

सर्वप्रथम वर्ष १९५६ मध्ये या गडावर केवळ १६ अतिक्रमणे होते. तेव्हापासून शासकीय दरबारी वाढत गेलेल्या प्रत्येक अतिक्रमणाची नोंद आहे. गेली ३०-३५ वर्षे हा लढा चालू असून इतकी वर्षे त्या वेळेपासूनचे असलेले जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी या अतिक्रमणांवर कारवाई का केली नाही ? सध्या गडाच्या तटाला भोके पाडून पाण्याच्या वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. यामुळे गडावरील बुरुज ढासळत आहेत. यावर वेळोवेळी असलेल्या प्रशासकीय अधिकार्‍यांनी का कारवाई केली नाही ? या गडावर एका व्यक्तीच्या नावावर ३ मजली घर आह. निवासाच्या नावाखाली इथे टोलजंग इमारती बांधल्या असून त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे.

आता गडावरील बांधकाम पाडण्यासाठी शासन १ कोटी १७ लाख रुपये खर्च करणार आहे. वास्तविक हा पैसा सर्वसामान्य जनतेचा असून ज्यांच्यामुळे हे अतिक्रमण झाले, त्या अधिकार्‍यांवर कारवाई होणे अपेक्षित असून त्यांच्याकडून हा खर्च वसूल केला पाहिजे, अशी मागणीही श्री. कुंदन पाटील यांनी या प्रसंगी केली.

या संदर्भात हिंदु एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर म्हणाले, ‘‘या गडावर जसे मुसलमानांचे अतिक्रमण आहे, तसेच हिंदूंचेही आहे. आम्ही सर्वच अतिक्रमणे काढण्याची मागणी केली आहे. त्यामुळे सूत्राला कुणीही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नये.’’

संभाजीराजे यांनी राज्यातील सर्व गड-दुर्गांवरील अतिक्रमण काढण्याचे नेतृत्व करावे !

छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यातील सर्व गड-दुर्गांवरील अतिक्रमण, ते कोणत्या धर्माचे आहे ?, याचा विचार न करता काढण्यासाठी नेतृत्व करावे. राज्यातील सर्व सकल हिंदु समाज त्यांच्या मागे उभा राहील, अशी ग्वाही याप्रसंगी श्री. कुंदन पाटील यांनी दिली.

शासनाने हिंदूंच्या सहनशीलतेचा अंत न पहाता राज्यातील सर्व गड-दुर्गांवरील अतिक्रमणे त्वरित हटवावीत !

यापुढील काळात शासनाने हिंदूंच्या सहनशीलतेचा अंत न पहाता राज्यातील सर्व गड-दुर्गांवरील अतिक्रमणे त्वरित हटवावीत. असे न केल्यास ‘वक्फ’ने राज्यातील ज्या गड-दुर्गांवर अतिक्रमण केले आहे, तेथे आम्ही मंदिरे बांधू आणि याचे सर्वस्वी दायित्व शासनाचे राहील. याचा प्रारंभ लवकरच आम्ही पन्हाळा गडावर करू. शासनाने हिंदूंना कायदा हातात घेण्यास बाध्य करू नये.