संपादकीय : स्वदेशीचा आवाज बंद !

सर्वांच्या परिचयाचे असलेले विदेशी सामाजिक माध्यम म्हणून ‘एक्स’ सध्या नावाजलेले आहे; पण ते विदेशी असल्याने त्याला प्रतिस्पर्धी म्हणून भारताने वर्ष २०२१ मध्ये ‘कू’ नावाचे ॲप चालू केले. तत्कालीन ट्विटरला (आताच्या ‘एक्स’ला) प्रतिस्पर्धी  म्हणण्यापेक्षा ‘कू’ हे भारतीय सामाजिक माध्यम म्हणून त्या वेळी लाखो भारतियांनी ‘कू’ ॲपचा मोठ्या प्रमाणात वापर चालू केला. प्रारंभीच्या काळात गुंतवणूकदारांकडून २१८ कोटी रुपयांचा निधी जमवण्यात आला. त्यामुळे ‘कू’ची भरभराट होणार, हे निश्चित होते. भारतातील अनेक अतीमहनीय व्यक्तींनी त्यात त्यांची खाती उघडली होती. स्वदेशी ॲप म्हणून त्याला प्रोत्साहन दिले गेले. ‘कू’चे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उन्मय राधाकृष्ण यांचा ‘कू’ला भविष्यात जगातील सर्वांत मोठे सामाजिक माध्यम बनवण्याचा मानस होता. ‘यामध्ये भारतियांची चांगली साथ लाभेल आणि ते इच्छित ध्येयापर्यंत लवकर पोचण्यास साहाय्य करतील’, अशी त्यांना आशाही होती; पण शेवटी काय झाले ? तर भांडवल अल्प पडल्याने ‘कू’ ॲप बंद करण्याची परिस्थिती नाईलाजास्तव त्यांच्यावर ओढवली. ३ जुलै या दिवशी संबंधित ॲपच्या मालकांनी ते बंद करत असल्याचे निवेदन प्रसारित केले.

‘कू’ ॲपचे सहसंस्थापक अप्रमेय आणि मयांक यांनी सांगितले, ‘‘जगातील ८० टक्के लोक इंग्रजीव्यतिरिक्त १ सहस्र भाषा बोलतात. त्यांना जवळ आणून त्यांच्यात विचारांची देवाणघेवाण होण्यासाठी आम्ही ‘कू’ ॲप चालू केले होते. प्रारंभी या ॲपला ६ कोटी ‘डाऊनलोड’, ८ सहस्र अतीमहनीय खाती, तसेच १०० प्रकाशक खाती लाभली होती; परंतु भांडवलाची मोठी समस्या होती. गेल्या २ वर्षांत आम्ही त्यासाठी पुष्कळ प्रयत्नही केले; पण त्यात यश न आल्याने दु:खी मनाने आम्हाला ‘कू’ ॲप बंद करावे लागत आहे.’’ भारताव्यतिरिक्त अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर, कॅनडा, नायजेरिया, संयुक्त अरब अमिरात, अल्जेरिया, नेपाळ, इराण यांच्यासह २०० हून अधिक देशांमध्ये ‘कू’चा वापर होत होता. ‘कू’ हे मध्यंतरी जगातील दुसरे सर्वांत मोठे सामाजिक माध्यम झाले होते. असे असतांना त्याच्यावर बंदीची वेळ येणे दुर्दैवीच म्हणावे लागेल.

‘ट्विटर’ (आताचे ‘एक्स’) या विदेशी सामाजिक माध्यमाने मध्यंतरी ‘कू’चे खाते संबंधितांना पूर्वकल्पना न देता बंद केले होते. हे खाते लोकांच्या प्रश्नांसाठी चालू करण्यात आले होते. यापूर्वी ट्विटरने ‘न्यूयॉर्क टाइम्स’, ‘वॉशिंग्टन पोस्ट’, ‘सी.एन्.एन्.’ यांसह अनेक प्रमुख वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांतील पत्रकारांची खाती बंदी केली होती. थोडक्यात काय, तर ट्विटरला स्वतःचेच घोडे दामटवायचे होते. ‘कुणीच प्रतिस्पर्धी नको, कुणाशी मित्रत्व नको’, अशी भूमिका असल्याने कुणीही आपल्या वरचढ होऊ नये, या उद्दाम भावनेने ट्विटरने सर्वांचेच पाय खेचायचे ठरवले होते. तसे त्याने केलेही !

‘स्वदेशी’ला जिंकवा !

भारत आर्थिक महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे. त्या दृष्टीने स्वदेशीला चालना देण्याचा प्रयत्न अनेक क्षेत्रांमध्ये होत आहे. काही ठिकाणी किंवा काही उत्पादनांमध्ये स्वदेशीची भरभराट होत आहे. स्वदेशीची पावले दमदाररित्या पडत आहेत. त्याद्वारे भारतियांचा आत्मविश्वासही वृद्धींगत होत आहे. संरक्षणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात भारत पुष्कळ प्रमाणात आत्मनिर्भर झाला आहे, हे सर्वंकष सत्य आहे.

विकासाच्या पार्श्वभूमीवर स्वदेशी-विदेशी संघर्ष चालूच रहाणार आहे. तो अटळ आहे; पण ‘भारतीय’ या नात्याने संघर्षात ‘स्वदेशी’ला जिंकवण्याचे दायित्व आपले आहे. या स्वदेशीच्या युद्धात केवळ उतरणे आणि केवळ एकच पाऊल टाकणे इतके अपेक्षित नाही, तर स्वदेशीसाठीची नागरिकांची अखंड वाटचाल यात आवश्यक आहे. नागरिकांच्या जोडीला व्यावसायिकांचाही मोठा सहभाग यात लाभायला हवा. आता ‘कू’च्या संदर्भात जशी भांडवलाची समस्या ‘आ’ वासून समोर उभी राहिली, मोठ्या आस्थापनांमध्ये ‘कू’चे विलीनीकरण करण्याच्या वाटाघाटी अपयशी ठरल्या, तशी वेळ कोणतेही स्वदेशी उत्पादन किंवा माध्यम यांवर भविष्यात येऊ नये, असे वाटते. प्रत्येकाने आपापल्या परीने साहाय्याच्या दृष्टीने हातभार लावला, तर देशाचा विकास होणारच आहे. विकास स्वदेशीच्या पायावर झाला, तरच तो सार्थकी लागणार आहे.

राष्ट्राभिमान नसल्याचा परिणाम !

स्वदेशीच्या पुरस्कर्त्यांनी ‘कू’च्या उदाहरणातून खचून जाऊ नये. ‘कू’ची घोडदौड ४ वर्षे चालली, हेही भारतासाठी काही थोडेथोडके नव्हे ! आता तर अनुभव गाठीशी आहे. त्यामुळे आणखी सखोल विचारविनिमय, तसेच अभ्यास आणि नियोजनपूर्वक कृती केल्यास निश्चितच यश मिळू शकेल. ‘कू’ ॲपमध्ये याआधी भारतातील विविध मंत्री, मान्यवर, तसेच चित्रपटसृष्टीतील अभिनेते-अभिनेत्री यांचीही खाती होती. मग ‘कू’ ॲपच्या अस्तित्वासाठी त्यांनी काहीच पावले का उचलली नाहीत ? स्वदेशीचा पुरस्कार का केला नाही ? बंदीची वेळ येईपर्यंत सर्वजण का गप्प बसले ? विविध भाषांमध्ये अस्तित्वात असूनही ‘कू’ला असा फटका का बसला ? प्रत्येक वेळी भाषण किंवा अभिव्यक्तीस्वातंत्र्याचाच आवाज का दाबला जातो ? भांडवलदारांनी पुढे येऊन भांडवल का उपलब्ध करून दिले नाही ? या सर्वच प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत. सध्या अनेक जण सामाजिक माध्यमांवर सक्रीय असतात. त्यांना ‘रिल्स’च्या माध्यमातूनही स्वदेशी ॲपविषयी प्रबोधन करता आले असते; पण तसे झाले नाही. थोडक्यात काय, तर ‘कू’ या स्वदेशी ॲपवर बंदीची वेळ येणे, हा जनतेत राष्ट्राभिमान नसल्याचाच परिणाम होय ! जर भारतीयत्व जागृत असते, तर आज ही वेळच आली नसती. सर्वांनीच ‘कू’ ॲपला डोक्यावर घेतले असते, त्याच्याविषयी मोठ्या प्रमाणात जागृती झाली असती, विविध पोस्टच्या माध्यमातून प्रसारही झाला असता; पण राष्ट्राभिमानशून्यतेमुळे असे काहीच झाले नाही. विदेशातील लोक त्यांच्या सामाजिक माध्यमांविषयी जागरूक आणि सतर्क असतात. तीच माध्यमे वापरण्याकडे त्यांचा अधिक कल असतो. तसे भारतात होत नाही. भारतात याउलट आहे. ‘हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे’, अशी भारतियांची मनोवृत्ती आहे. भारतीयत्व खुंटीला टांगून पाश्चिमात्याची झूल पांघरली जाते. भारतीय वस्तूंना नाके मुरडली जातात, तर विदेशी वस्तूंसाठी हात पसरले जातात. हा भेद थांबल्याविना स्वदेशीचे पीक येणार नाही. त्यासाठी सर्वत्र देशभक्तीची बिजे रोवायला हवीत, तरच राष्ट्राभिमान निर्माण होईल. ‘मी स्वदेशी वस्तू वापरून माझ्यात भारतीयत्व रुजवण्याचा प्रयत्न करणार’, असा निश्चय सर्वांनी करायला हवा ! भारतियांनी विदेशी राष्ट्रांना नफा मिळवून न देता भारतीय बाजारपेठांची भरभराट करायला हवी ! स्वदेशीचा पुरस्कार करणे, ही काळाची आवश्यकता आहे.

विदेशी राष्ट्रांना नफा मिळवून न देता भारतीय बाजारपेठांची भरभराट होण्यासाठी भारतियांमध्ये राष्ट्राभिमान निर्माण होणे आवश्यक !