|
गौहत्ती (आसाम) – ब्रह्मपुत्रा नदीला आलेल्या पुरामुळे आसाम राज्यात हाहा:कार माजला आहे. पुरामुळे आतापर्यंत ४६ जणांचा बळी गेला असून ३ जुलैला पुराच्या पाण्यात बुडून एकूण ८ जणांचा मृत्यू झाला. १६ लाखांहून अधिक लोक पुराच्या पाण्यामुळे बाधित आहेत. आसाम प्रशासनाने पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये ५१५ साहाय्य छावण्या निर्माण केल्या असून तेथे अनुमाने ४ लाख लोक आश्रय घेत आहेत. राज्यातील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात ११ प्राणी पुराच्या पाण्यात बुडाले असून ६५ प्राण्यांना वाचवण्यात यश आले आहे. ब्रह्मपुत्रा नदीसह राज्यातील इतर नद्याही धोक्याच्या पातळीवरून वहात आहेत.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राज्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले की, राज्यातील विनाशकारी पूर प्रामुख्याने शेजारच्या अरुणाचल प्रदेशात झालेल्या ढगफुटीमुळे आला आहे. चीन, भूतान आणि अरुणाचल प्रदेश येथील वरच्या भागांत अतीवृष्टीमुळे पूर आला. हे भौगोलिक कारण असून यावर प्रतिबंध घालणे आमच्या हातात नव्हते.
आसाम राज्यात आकडेवारीच्या रूपात झालेली हानी अशी !
१. राज्यातील २९ जिल्ह्यांत असलेल्या किमान १६.२५ लाखांहून अधिक लोक बाधित !
२. ४२ सहस्र ४७६ हेक्टर पीक क्षेत्र पाण्याखाली !
३. २ सहस्र ८०० गावे बाधित !
४. १०० रस्ते, १४ पूल आणि ११ तटबंध यांची हानी !
अरुणाचल प्रदेशात ६० सहस्र लोक बाधित !
अरुणाचल प्रदेश राज्यातही पूरस्थिती गंभीर आहे. प्रशासकीय अधिकार्यांनी सांगितले की, राज्यात ६० सहस्रांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. नामसाई, लोहित, चांगलांग आणि पूर्व सियांग, या ४ जिल्ह्यांत भीषण पूर आला आहे. काही ठिकाणी भूस्खलन झाले आहे.
सततच्या पावसामुळे मणीपूर राज्यातील पश्चिम इंफाळ आणि पूर्व इम्फाळ जिल्ह्यांतही अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. सेनापती जिल्ह्यातील सेनापती नदीत २ जणांचा बुडून मृत्यू झाला.