प्रसिद्धीची जीवघेणी हौस !

रील बनवण्याच्या नादात जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करणारे तरुण व तरुणी (घटनास्थळ: पुणे )

समाजमाध्यमांवर स्वतःला प्रसिद्ध करण्याविषयीचे आकर्षण सध्या इतक्या प्रमाणात वाढले आहे की, त्याने विकृत स्वरूप धारण केले आहे. लोकांना काहीही करून ‘व्हायरल’ (प्रसारित) व्हायचे आहे, प्रसिद्धी मिळवायची आहे. त्यासाठी ‘स्वतःचा आणि इतरांचा जीव पणाला लावावा लागला, तरी चालेल’, अशी मानसिकता झाली आहे. त्यासाठी पोलीस आणि कायदा यांचे भय नाही. ही मंडळी संधी मिळताच चित्र-विचित्र ‘स्टंट’ करून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. काही दिवसांपूर्वी ‘चारचाकी चालवण्याचे रील (३० सेकंदाचा व्हिडिओ बनवून प्रसारित करण्याची आलेली नवरूढी) बनवत असतांना तरुणी दरीत कोसळून मरण पावली’, ही बातमी आपण वाचली. याआधी अनेकदा कधी पावसात समुद्रकिनारी धाडस करतांना, कधी सुसाट गाड्या चालवतांना, कधी रेल्वेच्या रुळावर रील बनवतांना अनेकांचा मृत्यू झाला आहे. वाहतुकीचे नियम मोडून रस्त्यावर वाहनांची भन्नाट ‘स्टंट’बाजी करतांनाचे व्हिडिओ प्रसारित होतात. असाच एक जीवघेणे धाडस करणारा व्हिडिओ मागील आठवड्यात प्रसारित झाला. पुण्यातील दरी पूल भागात एक तरुणी उंच इमारतीच्या छतावरून लटकलेली दिसत आहे. एक तरुण आपल्या बाहुबलाचे प्रदर्शन करत तिला एका हाताने पकडून ठेवतो. ही तरुणी एका हाताच्या आधारे हवेतच १७ सेकंद तरंगत रहाते, तीसुद्धा रीलसाठी फारच उत्साहाने हावभाव करून दाखवत आहे. समजा चुकून हात सटकला आणि ती मुलगी खाली पडली, तर तिचा जीव तर जाईलच आणि उर्वरितांचेही संपूर्ण आयुष्यही पणाला लागेल, ही भीती त्यांच्या मनाला स्पर्शत नाही का ?

सध्या प्रसारित होत असलेल्या अन्य एका धक्कादायक व्हिडिओमध्ये एक महिला एका वेगवान रेल्वे डब्याच्या दारात उभी राहून चित्रपट गीतावर आनंदाने नाचत असल्याचे दिसून येते. तिचा थोडा जरी तोल गेला, तरी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही तिने न घाबरता रील बनवणे चालूच ठेवले आहे. विनाकारण शौर्य दाखवू पहाणार्‍यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच ! परंतु ‘रील कल्चर’चा एवढा मोह एवढा आहे की, त्या नादात आपण आपली, तसेच समाजाची आणि पर्यायाने राष्ट्राची अपरिमित हानी करत आहोत, हे लक्षात येत नाही. ‘रील’ करून आपल्याला कदाचित सहस्रो ‘लाईक्स’ मिळतील, पुढे दर्शकसंख्या वाढल्यावर त्या अनुरूप पैसेही मिळतील, प्रसिद्धी मिळेल; मात्र जीव गेला अथवा गंभीर अपघात झाला, तर ती मिळालेली प्रसिद्धी, पैसा यांचा काय उपयोग ? जीवघेणे ‘रील्स’ म्हणजे ‘असंगाशी संग’ होय. खरे तर सर्जनशीलता आणि कल्पकतेला वाव देणार्‍या ‘रील’ कलेचा उपयोग समाजप्रबोधन अन् जागृती करण्यासाठी अधिक चांगला करता येईल. त्यायोगे प्रसिद्धी मिळेल आणि विधायक कार्यही होईल. त्या दृष्टीने तरुणांचे प्रबोधन करणे ही काळाची आवश्यकता आहे.

– श्रीमती धनश्री देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.