सातारा, ३० जून (वार्ता.) – सातारा नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक प्रवीण यादव यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने अपसंपदेचा (अतीसंपत्तीचा) गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याविषयी यादव यांना नोटीस पाठवली आहे. सातारा नगरपालिका प्रशासनानेही या प्रकरणाची गंभीर नोंद घेतली आहे.
सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्रवीण यादव यांच्या विरोधात अपसंपदा (अतीसंपत्ती) उत्पन्न कमावल्याची तक्रार प्रविष्ट झाली होती. या तक्रारीची नोंद घेऊन १ जानेवारी २०१० ते ८ जानेवारी २०२० या कालावधीत झालेल्या तपासणी मोहिमेमध्ये प्रवीण यादव यांनी एकूण उत्पन्न स्रोताच्या २८ टक्के अधिक संपत्ती वाममार्गाने मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे. ही अपसंपदा ११ लाख ७० सहस्र रुपये आहे. याविषयी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
५ वर्षांपूर्वी सातारा नगरपालिकेत २ लाख ५० सहस्र रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी उपमुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्या वेळी ३ आरोग्य निरीक्षकांची चौकशी झाली होती. त्यामध्ये प्रवीण यादव यांचाही समावेश होता. सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनीही या प्रकरणाची गंभीर नोंद घेतली असून यादव यांच्यावर प्रशासकीय कारवाईला प्रारंभ केला आहे.
संपादकीय भूमिकागुन्हा नोंद करण्यासमवेत त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक ! |