ज्योतिषशास्त्रानुसार येत्या ३ वर्षांत घटनात्मक हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्पष्ट संकेत ! – आचार्य डॉ. अशोक कुमार मिश्र, सभापती, एशिया चैप्टर, विश्व ज्योतिष महासंघ

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचा सातवा दिवस (३० जून)

आचार्य डॉ. अशोक कुमार मिश्र

विद्याधिराज सभागृह : वर्ष २०२५ मध्ये बृहस्पति, राहु आणि शनि यांचे राशी परिवर्तन होणार आहे. या तीनही ग्रहांचे राशी परिवर्तन दुर्लभ आहे. यामुळे वर्ष २०२५ च्या उत्तरार्धात धर्मनिष्ठांना बळ प्राप्त होईल. श्रीरामजन्मभूमी निकालाच्या वेळी गुरु आणि शनि या ग्रहांचा संयोग झाला होता. त्यावेळी न्यायव्यवस्थेत अचानक पालट झाला होता. तसाच संयोग वर्ष २०२५ ते २०२७ या कालावधीत आहे. त्यामुळे येणार्‍या ३ वर्षांत हिंदुत्वाच्या हिताचे मोठमोठे निर्णय होतील. वर्ष २०२७ पर्यंतचा काळ हिंदुत्वासाठी अनुकूल आहे. ज्योतिषशास्त्रानुसार येत्या ३ वर्षांत घटनात्मक हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्पष्ट संकेत दिसत आहेत. पुढील २ वर्षे हा परिवर्तनाचा काळ आहे. संघटितपणे कार्य करण्याची आवश्यकता आहे. येणार्‍या काळात हिंदु राष्ट्राच्या आधारशीलेचे निर्माण करायला हवे. दैवी शक्तीही हिंदूंना साहाय्य करत आहेत. अशा वेळी हिंदूंनी गतीने हिंदुत्वाचे कार्य करण्याची आवश्यकता आहे. अनुकूल काळात कार्यात शिथिलता आली, तर मोठे कार्य सुटू शकते. त्यामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंनी संघटित प्रयत्न करणे आवश्यक आहे. बृहस्पति हा वैदिक धर्माचा तारक ग्रह आहे. येत्या काळात बृहस्पति ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे चीन आणि रशिया या साम्यवादी देशांतील व्यवस्था पालटण्याची शक्यता आहे. या देशांमध्ये धर्माच्या सिद्धांतावर चालणारे सरकार येण्याची शक्यता आहे.

हिंदुत्वाचे रक्षण म्हणजे संपूर्ण मानवतेचे रक्षण !

हिंदु राष्ट्राची निर्मिती ही केवळ हिंदूंसाठी नाही, तर यातून संपूर्ण मानवतेचे रक्षण होणार आहे. निसर्गाने प्राण्यांनाही रक्षणासाठी नखे, दात दिले आहेत. स्वत:चे रक्षण करणे, हा प्रकृतीचा धर्म आहे. त्याप्रमाणे हिंदु धर्माचे रक्षण हे प्रकृतीचे रक्षण होय, असे आचार्य डॉ. अशोक कुमार मिश्र म्हणाले.