अर्थसंकल्पातील उर्वरित घोषणा !

या अतिरिक्त अर्थसंकल्पात एकूण खर्चासाठी ६ लाख १२ सहस्र २९३ कोटी रुपयांचे प्रावधान करण्यात आले आहे. यात महसुली जमा ४ लाख ९९ सहस्र ४६३ कोटी रुपये, तर महसुली खर्च ५ लाख १९ सहस्र ५१४ कोटी रुपये अंदाजित करण्यात आला आहे.

१. राज्यभरात पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर समान करण्याचे प्रावधान, १ जुलैपासून डिझेल २ रुपये ६५ पैसे, तर पेट्रोल ६७ पैशांनी स्वस्त होणार.

२. उच्च शिक्षण घेणार्‍या मुलींचे शिक्षण अन् परीक्षा शुल्क यांत १०० टक्के सवलत देणार.

३. ५ केंद्रीय सशस्त्र दलातील सैनिकांना व्यवसाय करातून सवलत, मुद्रांक शुल्क दंडात कपात, मुद्रांक शुल्क परतावा देणार.

४. वर्ष २०२३-२४ पासून ‘लेक लाडकी’ योजनेला प्रारंभ. मुलीच्या जन्मापासून ती १८ वर्षांची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने एकूण १ लाख १ सहस्र रुपये देण्यात येणार.

५. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ २१ ते ६० वर्षे वयोगटांतील पात्र महिलांना शासनाच्या वतीने प्रतिमहिना दीड सहस्र रुपये. प्रतिवर्षी ४६ सहस्र कोटी रुपये निधी देणार.

६. १ मे २०२४ नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावांची नोंद शासकीय दस्तऐवजांमध्ये तिचे नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव या क्रमाने करण्याचे बंधनकारक राहिल.

७. १७ शहरांतील १० सहस्र महिलांना ‘पिंक इ-रिक्शा’ खरेदीसाठी अर्थसाहाय्य. ८० कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल.

८. शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान १० सहस्र रुपयांवरून २५ सहस्र रुपये.

९. राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या पडताळणीसाठी उपकरणे अन् साहित्यांसाठी ७८ कोटी रुपये देणार.

१०. जल जीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातील १ कोटी २५ लाख ६६ सहस्र ९८६ घरांना नळजोडणी करणार.

११. ‘लखपती दीदी : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती’ अभियानांतर्गत ७ लाख नवीन गटांची स्थापना. बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत १५ सहस्र रुपयांवरून ३० सहस्र रुपयांची वाढ होईल. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना ‘उमेद मार्ट’ आणि ‘ई-कॉमर्स ‘ऑनलाईन प्लॅटफॉर्म’ यांद्वारे आतापर्यंत १५ लाख महिला ‘लखपती दीदी’ झाल्या आहेत. या वर्षात २५ लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दिष्ट आहे.

१२. अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलनाचे राज्यात आयोजन होईल.

१३. रायगडावर प्रतिवर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करणार.

१४. रुग्णांची विशेषतः गरोदर माता-बालकांची आरोग्य संस्थेत विनामूल्य ने-आण करण्यासाठी ३ सहस्र ३२४ रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार.

१५. वन्य प्राण्यांच्या आक्रमणात जीवित हानीभरपाईच्या रकमेत २० लाख रुपयांवरून २५ लाख रुपये, कायमचे अपंगत्व आल्यास ५ लाख रुपयांवरून ७ लाख ५० सहस्र रुपये, गंभीर घायाळ झाल्यास १ लाख २५ सहस्र रुपयांवरून ५ लाख रुपये, किरकोळ घायाळ झाल्यास २० सहस्र रुपयांवरून ५० सहस्र रुपये अशी वाढ केली.

१६. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीची जिथे रचना केली, त्या नेवासा येथील मंदिर परिसराचा विकास आराखडा सिद्ध करणार.