वर्ष २०२४ मधील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या पहिल्या दिवसाच्या (२४.६.२०२४ या दिवसाच्या) प्रथम सत्राचे सूक्ष्म परीक्षण

१. उद्घाटन

१ अ. पुरोहितांनी ३ वेळा शंखनाद करणे

१. ‘पुरोहितांनी ३ वेळा शंखनाद केल्यावर शंखातून प्रक्षेपित होणार्‍या तारक-मारक नादशक्तीतून सूक्ष्मातून सुदर्शनचक्र, रामबाण आणि त्रिशूळ या शस्त्रांचे वातावरणात प्रक्षेपण झाले. त्यामुळे ही शस्त्रे अधिवेशनात अडथळे निर्माण करणार्‍या अनिष्ट शक्तींना लागून त्यांचा नाश झाला.’ – सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

२. ‘वातावरणात पांढर्‍या रंगाची अनेक वर्तुळे सिद्ध झाली. त्यामुळे वातावरणाची शुद्धी झाली.’ – श्री. राम होनप (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१ आ. उपस्थित धर्माभिमान्यांनी जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाचा श्लोक म्हणून त्याला प्रार्थना करणे : ‘उपस्थित धर्माभिमान्यांनी जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाचा श्लोक म्हणून त्याला प्रार्थना केली. तेव्हा मला भगवान श्रीकृष्णाचे दर्शन झाले आणि त्याच्या हातातील श्रीमद्गवद्गीतेतून ब्राह्मतेज अन् सुदर्शनचक्रातून क्षात्रतेज यांचे प्रक्षेपण झाले. त्यामुळे सर्वांना धर्मकार्य करण्यासाठी आध्यात्मिक बळ मिळाले.

१ इ. उपस्थित धर्माभिमान्यांनी विविध देवतांना प्रार्थना करणे : उपस्थित धर्माभिमान्यांनी स्थानदेवता, ग्रामदेवता श्री वाघजाईदेवी, श्री रामनाथदेव आणि श्री शांतादुर्गादेवी यांच्या चरणी प्रार्थना केल्यामुळे धर्मकार्य करण्यासाठी संबंधित देवतांकडून त्यांच्याकडे शक्ती प्रक्षेपित झाली. त्यामुळे उपस्थित धर्माभिमान्यांच्या भोवती देवतांच्या कृपेचे संरक्षककवच निर्माण झाले.

१ ई. मान्यवर संतांनी दीपप्रज्वलन करणे

१. समईच्या ज्योतींतून लहान आकारातील असंख्य पिवळसर केशरी रंगाच्या ज्योतींची निर्मिती होऊन त्या ज्योती सभागृहात उपस्थित असणार्‍या हिंदुत्वनिष्ठांच्या हृदयात प्रविष्ट झाल्या आणि त्यांच्या हृदयात ‘धर्मज्योत’ प्रज्वलित झाली. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठांना धर्मजागृती आणि राष्ट्ररक्षण यांचे कार्य करण्याचे बळ मिळाले.’

– सुश्री (कु.) मधुरा भोसले

२. ‘वातावरणात सूक्ष्मातून पिवळ्या रंगाच्या अनेक ज्योती निर्माण झाल्या. त्यामुळे वातावरण सात्त्विक होण्यास साहाय्य झाले.’ – श्री. राम होनप

३. ‘संतांनी केलेल्या दीपप्रज्वलनामुळे उच्च लोकातील ईश्वरी शक्ती भूलोकाकडे आकृष्ट झाली आणि त्या शक्तीचे समाजात प्रक्षेपण होण्यास साहाय्य झाले.’ – श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१ उ. पुरोहितांनी वेदमंत्रपठण करणे

१. ‘पुरोहितांनी राष्ट्रोत्कर्षाशी संबंधित वेदमंत्रांचे पठण केले. त्यामुळे राष्ट्राचा उत्कर्ष होण्यासाठी देवतांचे कृपाशीर्वाद मिळाल्याचे जाणवले. ऋग्वेद आणि यजुर्वेद यांचे अस्तित्व सूक्ष्मातून सभागृहाच्या ठिकाणी जाणवले अन् वेदमंत्रांतून नादमय चैतन्याच्या लहरी सभागृहात पसरून संपूर्ण सभागृहाची शुद्धी झाली.’ – सुश्री (कु.) मधुरा भोसले

२. ‘मंत्रशक्तीने वातावरणात सोनेरी रंगाची दैवी शस्त्रे निर्माण झाली. त्यामुळे काही अनिष्ट शक्ती सभागृहातून पळून जातांना दिसल्या. यातून मंत्रांचे महत्त्व माझ्या लक्षात आले.

३. ‘मंत्रशक्तीमुळे अनिष्ट शक्तींच्या सूक्ष्म जगाला १ – २ सेकंद हादरे बसत आहेत’, असे मला सूक्ष्मातून दिसले.’

– श्री. राम होनप

१ ऊ. पुरोहितांचा सन्मान : ‘चारही वेदांचे अस्तित्व पुरोहितांच्या ठिकाणी जाणवून ‘वेदपुरुषा’चाच सन्मान झाला आहे’, असे मला जाणवले.

२. मृत झालेल्या हिंदुत्वनिष्ठांसाठी पुरोहितांनी मंत्रपठण करणे

अ. ‘सभागृहाच्या ठिकाणी काही अतृप्त जीव आलेले दिसले. त्यांतील काही जिवांना त्यांच्या चुकांची खंत वाटून रडू येत होते. ते स्वतःकडून झालेल्या चुकांसाठी देवाकडे क्षमायाचना करत होते.

आ. ‘३ – ४ जीव गतीमान होऊन पुढच्या गतीला गेले आहेत’, असे दृश्य मला दिसले.

इ. काही लिंगदेह विद्रूप झाले होते. मंत्रातील शक्तीमुळे त्यांच्यातील विद्रूपता न्यून झाली.’

ई. ‘मृत झालेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या आत्म्याला गती मिळण्यासाठी केलेल्या मंत्रोच्चारणामुळे अतृप्त लिंगदेहांभोवतीचे आवरण नष्ट होऊन त्यांना मृत्युत्तर पुढील प्रवास करण्यासाठी दैवी ऊर्जा मिळाल्याचे जाणवले. तेव्हा कार्यक्रमस्थळी अनेक ऑर्बज् (गोळे) आल्याचे दिसले.

– श्री. राम होनप

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संदेशाचे वाचन

अ. ‘संदेशाचे वाचन करण्यासाठी सद्गुरु सत्यवान कदम व्यासपिठावर येताच माझ्या मनाला शांतता जाणवू लागली.

आ. संदेशातील चैतन्य सहन न झाल्याने काही अनिष्ट शक्तींनी त्यांच्या कानांत बोटे घातली.

इ. सद्गुरु सत्यवान कदम यांच्या वाणीतून ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज प्रगट होत होते.’ – श्री. राम होनप

ई. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संदेश ऐकून ‘धर्मसंस्थापनेच्या कार्याला गुरुदेवांचे कृपाशीर्वाद मिळाल्याने धर्मसंस्थापनेच्या कार्यातील अडथळे दूर होणार आहेत’, असे मला जाणवले.

उ. गुरुदेवांचा आशीर्वादपर संदेश वाचून दाखवल्यामुळे त्यातील प्रत्येक शब्दातून ज्ञानशक्तीमय चैतन्यलहरींचे प्रक्षेपण होऊन उपस्थित हिंदुत्वनिष्ठांची मने आणि सभागृहातील वातावरण चैतन्याने भरून गेले अन् सर्वांच्या मनातील धर्मतेज जागृत झाले.’

– सुश्री (कु.) मधुरा भोसले

ऊ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे संदेशवाचन होत असतांना सभागृहात सूक्ष्मातून ज्ञानशक्तीचे प्रतीक असलेली पिवळी छटा पसरली होती.’ – श्री. निषाद देशमुख

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.