पुणे येथे भ्रमणभाष आणि भ्रमणसंगणक चोरणार्‍या २ सख्ख्या भावांना अटक !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – घरे आणि ‘पेईंग गेस्ट’ (भाडेकरू) रहाणार्‍या लोकांच्या घरात शिरून भ्रमणभाष, भ्रमणसंगणक (लॅपटॉप) आणि स्मार्ट घड्याळे चोेरणार्‍या २ सख्या भावांना बाबू बोयर आणि सुरेश बोयर येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १९ भ्रमणसंगणक, ६३ भ्रमणभाष, ४ स्मार्ट घड्याळे आणि १४ ‘आयफोन’ असा ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांनी १५ दिवसांमध्ये ५ पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये चोर्‍या केल्या आहेत. (गुन्हेगार एवढ्या चोर्‍या करेपर्यंत पोलिसांना लक्षात कसे येत नाही ?  – संपादक)

५ जून या दिवशी एका घरातून ३ भ्रमणभाष, १ भ्रमणसंगणक चोरीला गेले. तसेच ‘पेईंग गेस्ट’ म्हणून रहाणार्‍या मुलांच्या खोलीतून ९ जून या दिवशी ३ भ्रमणसंगणक आणि ७ भ्रमणभाष चोरीला गेले होते. त्याची नोंद पोलीस ठाण्यात केली होती. या गुन्ह्यांचे अन्वेषण चालू असतांना अशा चोर्‍या करणारे २ संशयित धानोरी खाणीशेजारी उभे असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यांच्याकडील साहित्याची पडताळणी करून अधिक चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याचे मान्य केले.