पू. शिवाजी वटकर यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव सोहळा पहातांना आणि सोहळ्याच्या वेळी जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती !

‘मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्यात त्यांच्याच कृपेने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी होण्याची संधी मिळाली. ब्रह्मोत्सव सोहळा ‘ऑनलाईन’ पहातांना आणि सोहळ्यानंतर गुरुकृपेने मला अनेक सूत्रे जाणवली अन् अनुभूतीही आल्या. त्या गुरुचरणी अर्पण करत आहे. यातील काही सूत्रे १९ जून २०२४ या दिवशी पाहिली. आज उर्वरित सूत्रे पाहूया.

भाग १ : https://sanatanprabhat.org/marathi/805386.html

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

२. ब्रह्मोत्सव सोहळा पहातांना जाणवलेली सूत्रे

२ इ. ‘परात्पर गुरु डॉक्टर परब्रह्म स्वरूपात भूतलावर अवतरले आहेत’, असे जाणवणे : ब्रह्मोत्सव पहातांना मला पुढील ओळी स्फुरल्या.

सच्चिदानंद परब्रह्म अवतरले भूवरी ।
चराचर सृष्टी आनंदली त्रिभुवनी ।। १ ।।

जन, राष्ट्र अन् धर्म जागृती झाली ।
ब्रह्मानंदी साधक विलीन झाले श्री गुरुचरणी ।। २ ।।

२ ई. ब्रह्मोत्सव सोहळ्यात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे जाणवलेले अवतारत्व

पू. शिवाजी वटकर

१. ब्रह्मोत्सव सोहळ्यात सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव काही बोलले नाहीत; पण त्यांनी साधकांना मौनातून, तसेच आध्यात्मिक स्तरावर सूक्ष्मातून अनेक गोष्टी शिकवल्या.

२. पूर्वी मला ‘परात्पर गुरु डॉक्टर हे अध्यात्म शिकवणारे संत, आध्यात्मिक मार्गदर्शक आणि गुरु आहेत’, असे वाटत असे; मात्र अलीकडच्या काळात महर्षींनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे अवतारी स्वरूप प्रगट होत असून ते जगासमोर येत आहे. जसे श्रीकृष्णाने अर्जुनाला विराट रूपात दर्शन दिले, तसेच परात्पर गुरु डॉक्टरांनी  साधकांना श्रीविष्णूच्या रूपात विराट दर्शन घडवले. शब्दांतून काही न सांगता प्रत्यक्ष दर्शन देऊन त्यांनी साधकांना स्वतःच्या अवतारत्वाचे दर्शन घडवले.

३. ब्रह्मोत्सव सोहळा संपल्यानंतर जाणवलेली सूत्रे

अ. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी त्यांचे आध्यात्मिक अधिकारी निश्चित करून सर्व साधकांना ‘ते साधकांच्या समवेत या आणि पुढील जन्मी असणार आहेत’, याची शाश्वती दिली आहे.

आ. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ साधकांवर प्रीती, चैतन्य आणि आनंद यांचा वर्षाव करत आहेत’, असे मला जाणवले.

इ. साधकांची श्रद्धा दृढ झाली आणि ‘भविष्यात आम्ही निश्चिंत राहून अधिक जोमाने अन् कठोर साधना करू शकू’, असे आम्हा साधकांना वाटू लागले.

ई. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवानंतर साधकांमध्ये साधना आणि सेवा करण्याची तळमळ अन् उत्साह वाढला आहे. साधक मानसिक स्तरावर न रहाता भाव, आनंद आणि शांती अनुभवत आहेत. ‘साधकांची सेवा आणि साधना यांची फलनिष्पत्ती वाढत आहे’, असे मला जाणवले.

उ. ‘ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने साधकांच्या हृदयमंदिरात सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव विराजमान झाले असून यापुढे ते साधकांना चैतन्य आणि शक्ती देणार आहेत’, असे मला वाटते.

ऊ. ब्रह्मोत्सव म्हणजे साधकांची साधना आणि हिंदु राष्ट्र-निर्मिती यांचा एक ऐतिहासिक टप्पा आहे.

४. सोहळ्याच्या वेळी आलेल्या अनुभूती

४ अ. कंबरदुखीचा त्रास असूनही कार्यक्रम पहाण्यासाठी आसंदीवर बराच वेळ बसल्यावर त्रास न होणे आणि सर्व संतांच्या सत्संगामुळे देहबुद्धीचा विसर पडणे : ब्रह्मोत्सव सोहळा ‘ऑनलाईन’ पहाण्यासाठी सनातनच्या देवद (पनवेल) आश्रमात बैठकव्यवस्था केली होती. मला कंबरदुखीचा त्रास असल्याने मी आसंदीवर अधिक वेळ बसू शकत नाही, तरीही मी ४ – ५ घंटे आसंदीवर बसू शकलो. गुरुकृपेने मला कोणताही त्रास झाला नाही. सोहळा प्रत्यक्ष पहाणारे आणि ‘ऑनलाईन’ पहाणारे साधक, संत, सद्गुरु, परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या सत्संगामुळे मला देहबुद्धीचा विसर पडला होता. त्यामुळे ‘कार्यक्रम कधी संपला ?’, हे मला कळलेही नाही.

४ आ. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यावर आलेल्या अनुभूती

४ आ १. ‘गुरुदेव त्यांच्या दृष्टीतून साधकांना कृपाशीर्वाद देत आहेत’, असे जाणवणे : सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले. तेव्हा सहस्रो साधक गुरुमाऊलींचे दर्शन घेत होते. त्या वेळी ‘गुरुदेव सर्व साधकांकडे पहात आहेत आणि त्यांच्या भावविभोर दृष्टीतून साधकांना कृपाशीर्वाद देत आहेत’, असे मला जाणवले.

४ आ २. ‘परात्पर गुरुदेव प्रत्येक साधकाला वैयक्तिक स्तरावर भेटत आहेत’, असे जाणवणे : गुरुदेवांना त्यांचे साधक प्रिय आहेत. ज्याप्रमाणे श्रीकृष्ण प्रत्येक गोपीच्या समवेत स्वतंत्रपणे रासलीला करत असे, त्याप्रमाणे ‘सोहळ्याला उपस्थित असलेल्या आणि सोहळा ‘ऑनलाईन’ पहाणार्‍या प्रत्येक साधकाला परात्पर गुरु डॉक्टर वैयक्तिक स्तरावर भेटत आहेत’, असे मला जाणवले.

यावरून ‘त्यांची सर्वशक्तीमानता, सर्वज्ञता आणि सर्वव्यापकता’, यांची मला जाणीव झाली, तसेच ‘ते प्रीतीचा सागर आणि श्रीकृष्णस्वरूप आहेत’, याची निश्चिती झाली.

४ इ. ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांसाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्याचे जाणवणे : सध्या साधकांच्या आध्यात्मिक त्रासांचे प्रमाण वाढत आहे; परिणामी साधकांच्या मनात साधना आणि सेवा यांविषयी विकल्प निर्माण होत आहेत. ‘जे साधक ब्रह्मोत्सवात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभागी झाले होते, त्यांच्यासाठी आध्यात्मिक स्तरावर उपाय करून सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी साधकांवरील त्रासदायक आवरण नष्ट केले’, असे मला जाणवले.

४ ई. ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी साधकांना साधना आणि सेवा करण्यासाठी नवचैतन्य देऊन त्यांच्याभोवती संरक्षककवचही निर्माण केले’, असे मला जाणवले.

५. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना ताम्रपट देऊन साधकांना त्यांच्या पुढील साधनाप्रवासाविषयी आश्वस्त करणे

महर्षींनी ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ असतील’, हे यापूर्वीच नाडीपट्टीवाचनातून घोषित केले होते. ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी या दोन देवींना उत्तराधिकारी असल्याचे लिहिलेले ताम्रपट देऊन त्यावर ‘शिक्कामोर्तब’ केले. ‘महर्षींच्या माध्यमातून सांगणारे अाणि ताम्रपट देणारे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवच आहेत’, असे मला वाटते; म्हणून त्यांनी सांगितलेली अन् ताम्रपटावर लिहिलेली ब्रह्मवाक्येच आहेत. ‘ही ब्रह्मवाक्ये ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने साधकांचा भाव आणि भक्ती वाढण्यास अत्यंत साहाय्यक ठरतील’, असे मला वाटते.

६. कृतज्ञता

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव हे साक्षात् परब्रह्म आहेत. ते साधकांवर ब्रह्मोत्सव सोहळा आणि इतर सर्वच माध्यमे यांतून प्रीती, भाव, आनंद अन् शांती यांचा वर्षाव करत असतात. मी हा ब्रह्मोत्सव केवळ स्थुलातून अनुभवला, म्हणजे मला सोहळारूपी हिमनगाचे टोकच दिसले. ‘गुरुदेवांनी माझ्यासारख्या साधकांसाठी ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने सूक्ष्मातून काय केले असेल ?’, हे केवळ तेच जाणू शकतात ! ‘या सोहळ्यातून ‘गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम् ।  म्हणजे ‘गुरुकृपा शिष्याचे परम कल्याण करते’, हे मला पुन्हा अनुभवायला मिळाले’, याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

(समाप्त)

– (पू.) शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.६.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक