छत्रपती संभाजीनगर येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची घोडा अन् उंट यांवरून मिरवणूक काढली !

माध्यान्ह भोजनात शिरा, खीर, बुंदी लाडवाचा समावेश !

प्रतिकात्मक छायाचित्र

छत्रपती संभाजीनगर – शाळेचा प्रारंभ चैतन्यमय आणि उत्साहवर्धक झाल्यास शिक्षक अन् विद्यार्थी यांना गुणात्मक वाटचालीसाठी गती मिळते. १५ जून या दिवशी येथे ‘शाळा प्रवेशोत्सव-२०२४’ उत्साहात साजरा करण्यात आला. नव्याने शाळेत भरती होणार्‍या विद्यार्थ्यांची बैलगाडी, घोडागाडी आणि उंट यांवरून गावात प्रभातफेरी काढून त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या शालेय विभागाने सिद्धता केली होती’, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी दिली.

मागील काही वर्षांपासून नव्याने प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांमधील शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती आणि गावकरी यांच्या सहभागातून उपक्रम राबवण्यात येतात. यावर्षीही त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. प्रत्येक तालुक्यात गटशिक्षणाधिकार्‍यांनी लोकप्रतिनिधींसह इतर अधिकारी, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांना पहिल्या दिवशी शाळेत पाहुणे म्हणून बोलवावे, असा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी काढला होता.