मराठा आरक्षणाच्या सगेसोयर्‍यांच्या कार्यवाहीसाठी सरकारला १३ जुलैपर्यंतचा वेळ !

सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीला !

मनोज जरांगे पाटील (मध्यभागी) यांची भेट घेतांना मंत्री शंभुराज देसाई (उजवीकडे) आणि खासदार संदीपान भुमरे (डावीकडे)

जालना – सगेसोयर्‍यांच्या कार्यवाहीसाठी राज्य सरकारला वेळ द्या. मराठा समाजाला सरकार आरक्षण देणारच आहे; मात्र आधी तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या आणि उपोषण मागे घ्या, अशी विनंती मंत्री शंभुराज देसाई यांनी मनोज जरांगे पाटील यांना केली. त्यानुसार सरकारच्या वतीने किमान १ महिन्याच्या कालावधीची म्हणजे १३ जुलैपर्यंतची मागणी या वेळी करण्यात आली. ही मागणी जरांगे पाटील यांनी मान्य केली आहे; मात्र ‘एका महिन्याच्या आत मागणी पूर्ण न केल्यास विधानसभा निवडणुका लढवण्यात येतील’, अशी चेतावणीही त्यांनी या वेळी दिली. या शिष्टमंडळात मंत्री शंभुराज देसाई, नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे आणि राणा जगजितसिंह यांचा समावेश आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे ८ जूनपासून पुन्हा ‘आमरण उपोषणा’ला प्रारंभ केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यशासनाच्या शिष्टमंडळाने १३ जून या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.