नागपूर – मणिपूर राज्य १ वर्षापासून धगधगत आहे. द्वेषाचे वातावरण निर्माण केल्याने मणिपूरमध्ये त्राहीत्राही झाली आहे. मणिपूर शांत करण्याला प्राधान्य द्यायला हवे, असे प्रतिपादन प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग २ चा समारोपीय सोहळा रेशीमबाग मैदानावर पार पडला. त्या वेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले,
१. समाजात एकात्मता आणि संस्कार हवेत. आपला समाज विविधतेने नटलेला आहे; मात्र सर्वांचे मूळ एकच आहे. दुसर्यांच्या मताचा सन्मान करायला हवा. आपण आपल्याच भावंडांना अस्पृश्य म्हणून बाजूला ठेवले. त्याला वेद आणि उपनिषद यांचा आधार नाही. अस्पृश्यता आणि भेदभाव कालबाह्य आहे. समाजात अन्याय झाल्याने एकमेकांविषयी द्वेष आणि अविश्वास आहे. अन्यायाप्रती असलेल्या संतापामुळे समाजातील लोक अप्रसन्न (नाराज) आहेत. त्यांना समवेत घ्यायला हवे.
२. लोकशाहीमध्ये निवडणूक ही अनिवार्य प्रक्रिया आहे. यात दोन पक्ष असल्याने स्पर्धा रहायला हवी; मात्र हे युद्ध नाही. प्रचारादरम्यान ज्या पद्धतीने टीका झाली, त्यातून समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. आता सरकार स्थापन झाले आहे. आता समस्यांवर चर्चा व्हायला हवी. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांनी सहमतीच्या राजकारणावर लक्ष द्यायला हवे.