|
नवी देहली – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी येथे पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर शेअर बाजाराच्या संदर्भात घोटाळा केल्याचा आरोप केला. या घोटाळ्यामुळे नागरिकांचा ३० लाख कोटी रुपयांची हानी झाल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. या प्रकरणाची संसदीय समितीकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. या वेळी सोनिया गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रियांका वाड्रा आदी उपस्थित होते.
राहुल गांधी यांनी आरोप करतांना म्हटले की,
१. पंतप्रधान मोदी यांनी २० मे या दिवशी वृत्तवाहिन्यांवरील मुलाखतीमध्ये म्हटले होते, ‘शेअर बाजार वेगाने पुढे जात आहे.’ ‘४ जूनला शेअर बाजार पुढे जाईल’, असे थेट गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. ‘लोकांनी शेअर्स खरेदी करावेत’, असेही ते म्हणाले.
२. मतदानोत्तर चाचणीचा अहवाल १ जून या दिवशी येणार होता; मात्र भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात त्यांना केवळ २२० जागा मिळत होत्या. गुप्तचर यंत्रणांनीच ही माहिती त्यांना दिली होती. मतदानोत्तर चाचणीत भाजपचे सरकार येत असल्याने सांगण्यात आले. त्यामुळे ३ जून या दिवशी शेअर बाजाराने विक्रम मोडले.
४ जूनला निवडणुकीचा निकाल येऊ लागल्यावर शेअर बाजार खाली आला. ३१ मे या दिवशी शेअर बाजारात काही जण उत्साहात होते. हे तेच लोक होते ज्यांना घोटाळा होत आहे, हे ठाऊक होते. येथे सहस्रो कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. ३० लाख कोटी रुपयांची हानी झाली. किरकोळ गुंतवणूकदारांची हानी झाली. हा भारतातील सर्वांत मोठा घोटाळा आहे.
३. राहुल गांधी पुढे म्हणाले की, देशाला मोदी आणि शहा नको आहेत. आमचा हा लढा राज्यघटना वाचवण्यासाठी होता. आमच्या पक्षाची खाती जप्त करण्यात आली. देशातील २ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना (केजरीवाल आणि हेमंत सोरेन) यांना कारागृहात टाकण्यात आले. त्यामुळे राज्यघटना वाचवण्यासाठी जनताच लढा देत आहे. जनतेने राज्यघटना आणि लोकशाही वाचवली आहे.
संपादकीय भूमिकाकाँग्रेसने तिच्या कार्यकाळात अनेक घोटाळे करून जनतेला लुटले. त्याविषयी राहुल गांधी का बोलत नाहीत ? |